कडेगाव-पलूस तालुके पुन्हा विकासाच्या वाटेवर !
By Admin | Updated: November 12, 2014 23:27 IST2014-11-12T22:17:01+5:302014-11-12T23:27:28+5:30
मतदारांचा विकासाला कौल : भाजपकडून निधी आणून पृथ्वीराज देशमुख पक्ष मजबूत करणार का?

कडेगाव-पलूस तालुके पुन्हा विकासाच्या वाटेवर !
रजाअली पीरजादे:शाळगाव :वस्तुत: राजकीय संघर्ष ज्या मतदारसंघात असतो, तेथे विकास झालेला दिसत नाही, असे बोलले जाते. परंतु महाराष्ट्रात कडेगाव-पलूस हा असा मतदारसंघ आहे, जेथे महाराष्ट्रात सर्वाधिक विकास झाला असल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीने पुन्हा एकदा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने हा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर आला आहे.
सांगली जिल्ह्यावर वसंतदादांचे वर्चस्व होते. त्या काळात खानापूरवर संपतराव माने, शहाजीबापू पाटील, तर तासगाव-पलूसमधून दिनकर आबा पाटील, बाजीरावआप्पा पाटील, वसंतराव पुदाले यांचे वर्चस्व होते. १९८० च्या निवडणुकीत त्यावेळी कडेगावातून संपतराव देशमुख, डॉ. पतंगराव कदम इच्छुक होते. डॉ. पतंगराव कदम यांचे नाव त्यावेळी जवळजवळ निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी वसंतदादा यांनी संपतराव चव्हाण यांचे नाव जाहीर केले. त्यावेळी संपतराव देशमुख हे संपतराव चव्हाण यांच्या पाठीशी ठाम राहिले. तेव्हापासून खऱ्याअर्थाने देशमुख-कदम यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला, तो आजअखेर कायम आहे. दरम्यानच्या काळात नागेवाडी कारखाना उभारणीवर कदम-देशमुख संघर्ष झाला. या काळात संपतराव देशमुख खानापूरचे सभापती झाले. जिल्हा परिषदेत निवडून गेल्यावर तेथे सभापती झाले. संपतराव देशमुख यांनी डोंगराई उद्योग समूहाची स्थापना केली. डोंगराई कारखाना (आताचा केन अॅग्रो) व डोंगराई सूतगिरणी, महालक्ष्मी मागासवर्गीय सूतगिरणीची उभारणी केली. इकडे पतंगराव कदम यांनी सागरेश्वर सूतगिरणी, सोनहिरा साखर कारखाना, पलूसमध्ये कृष्णा-वेरळा सूतगिरणी उभारली. याच काळात विधानसभा निवडणुका झाल्या. १९९५ च्या निवडणुकीत पतंगरावांचा पराभव झाला. नंतर संपतराव देशमुखांचे निधन झाले. पृथ्वीराज देशमुख यांनी पाणीप्रश्न घेऊन संघर्ष चालू ठेवला. १९८० ते २००० पर्यंत देशमुख-कदम यांच्यात मोठा संघर्ष सुरूच राहिला. या काळात २००० मध्ये पलूस तालुक्याची निर्मिती आ. पृथ्वीराज देशमुख यांनी केली, तर २००४ मध्ये कडेगाव तालुक्याची निर्मिती कदम यांनी केली. या कदम-देशमुख राजकीय संघर्षात कडेगाव, पलूसचा मोठा विकास झाला. ताकारी, टेंभू कार्यान्वित झाल्या.
पलूसचा क्षारपड जमीन विषय गाजला. गावा-गावात रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय झाली. कडेगाव-पलूसमध्ये शासकीय कार्यालये उभी राहिली. अनेक लोकोपयोगी कामे झाली. खरे पाहता, राजकीय संघर्षातून एवढा मोठा विकास झालेला कुठेही पाहावयास मिळत नाही. १९८० ते २०१४ दरम्यान राजकीय अनेक बदल झाले. परंतु कदम-देशमुख यांच्यामधील संघर्ष निवळला नाही. पतंगराव कदम या ना त्या कारणाने सत्तेत राहिले.
आज राजकीय परिस्थिती बदलली आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. कदम विरोधी बाकावर बसणार आहेत, असे असले तरी, ते मतदारसंघाशी संपर्क ठेवून राहतील, तर देशमुख पुढील निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विकासकामांना चालना देतील, अशी अपेक्षा मतदारसंघातील जनतेला आहे.
कदम-देशमुख यांच्यातील संघर्ष टोकाला
डॉ. पतंगराव कदम यांनी, आपण पुन्हा निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले असले तरी, ते स्वत: उभे राहिले नाहीत तरी, पुढील निवडणुकीस पुत्र डॉ. विश्वजित कदम यांना उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉ. कदम यांना पुन्हा एकदा या मतदारसंघात विकासकामे केल्याशिवाय पर्याय नाही. साहजिकच कदम-देशमुख यांच्यातील संघर्ष भविष्यात तीव्र होणार असून, दोघांनाही मतदारसंघात जोमाने विकासाची कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे या दोघांच्या राजकीय संघर्षात या मतदारसंघाची भरभराट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.