कडेगाव : आनंद आणि उत्साहाचा दिवस नुकताच मागे पडला होता आणि दुसऱ्याच दिवशी भोसले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कडेगाव-पलूसचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांची कन्या इक्षिता रणजित भोसले (वय ६, रा. राजवडी, ता. माण, जि. सातारा) हिचा बुधवारी (ता. ३) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातातमृत्यू झाला. दसुरपाटी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील पंढरपूर महामार्गावर मोटारकार दुभाजकाला धडकल्याने हा अपघात घडला.इक्षिता हिचा वाढदिवस मंगळवारी (ता. २) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. कुटुंबीयांच्या डोळ्यांपुढे अजूनही फुगे, सजावट आणि तिच्या हास्याचे तेज होते, पण दुसऱ्याच दिवशी नियतीने क्रूर धक्का देत या कुटुंबीयांचा आनंद हिरावला. बुधवारी इक्षिता, आजी-आजोबा आणि अन्य नातेवाईक असे पाचजण पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते.दुपारी त्यांची गाडी दसुरपाटीनजीक दुभाजकाला धडकल्याने सहा वर्षांची इक्षिता गंभीर जखमी झाली. तत्काळ तिला अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या अपघातात अन्य चौघांना किरकोळ दुखापत झाली असून कुटुंब आणि गावावर शोककळा पसरली आहे. वाढदिवसातील हसू आणि आनंद काही तासातच दु:खाच्या काळोखात विरून गेला. इक्षिताच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
Sangli: वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशीच चिमुकलीचा अपघाती मृत्यू, कडेगाव-पलूसच्या प्रांताधिकाऱ्यांची कन्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:19 IST