कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणी इस्लामपुरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:20 IST2019-08-30T13:18:51+5:302019-08-30T13:20:38+5:30
मोर्चात राज्यभरातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणी इस्लामपुरात मोर्चा
इस्लामपूर (जि. सांगली) : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात महारयत कंपनीकडून आठ हजार शेतकऱ्यांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज असून, कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी आज इस्लामपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. प्रहार संघटना आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात राज्यभरातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार सहभागी झाले होते.
यावेळी मारुती खाडे (सांगरुळ, जि. कोल्हापूर) म्हणाले की, शेतकऱ्यांनी पै पै साठवून या व्यवसायात गुंतवणूक केली. पैसे घेताना मंत्र्यांचा मुलगा हजर होता, सुधीर मोहिते, संदीप मोहिते हे संचालक हजर होते. मग आता याच्याशी आपला संबंध नाही, असे मंत्री कसे म्हणतात?
रेश्मा पवार या पारधी महिलेने सांगितले की, सुधीर मोहितेलाही मोक्क्याखाली घाला.
निर्मला पवार म्हणाल्या की, नवरा मेल्यावर पोरांसाठी काहीतरी करूया म्हणून कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला. त्यातही तोटा झाला. चोरीचा धंदा सोडून चांगले काही तरी करावे म्हणून पैसे गुंतवले. शेतकरी, पारधी समाजाला फसवणाऱ्या या सर्वांना मोक्का लावा.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी म्हणाला की, ९ लाख रुपये कर्ज काढून या कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवले. ते पैसे मंत्र्यांनी परत करावेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय हलणार नाही.