आष्ट्याची वाटचाल ‘निर्मल’ शहराकडे
By Admin | Updated: November 22, 2014 00:02 IST2014-11-21T23:25:04+5:302014-11-22T00:02:42+5:30
२२५० शौचालये पूर्ण : दोन कोटी ६५ लाखांची योजना

आष्ट्याची वाटचाल ‘निर्मल’ शहराकडे
सुरेंद्र शिराळकर-आष्टा शहरात २ कोटी ६५ लाख रुपये खर्चाची एकात्मिक शौचालय योजना राबिवण्यात येत आहे. केंद्र शासन ७५ टक्के, राज्य शासन १५ टक्के व लाभार्थी १० टक्के खर्चून शहरात सुमारे २६५० शौचालये बांधण्यात येत आहेत. सुमारे २२५० शौचालये बांधून पूर्ण झाली असून, लवकरच आष्टा शहर हागणदारीमुक्त होणार आहे.
आष्टा पालिकेने २००४ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात ‘क’ वर्गात पालिका गटातून दुसरा क्रमांक पटकाविला होता. पालिकेस १० लाखांचे बक्षीस मिळाले होते. शहराच्या विकासासाठी विविध योजना मंजूर झाल्या. त्यापैकीच एकात्मिक कमी खर्चाची शौचालय योजना (आयएलसीएसएल) मंजूर झाली. राज्यात फक्त अमरावती व आष्टा पालिकेस ही योजना मंजूर झाली आहे. प्रत्येक कुटुंबास केवळ २२०० रुपयात शौचालय बांधून मिळाले आहे. केंद्र व राज्य शासन ९ हजार व लाभार्थी २२०० रुपये अशी ही योजना होती.
आजअखेर सुमारे २२५० शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. परंतु उर्वरित ४०० कुटुंबप्रमुखांनी शौचालय मंजूर असूनसुध्दा त्याचा लाभ घेतलेला नाही. अशा ४०० नागरिकांना जादा रक्कम द्यावी लागणार आहे. सध्या ११ हजार २०० रुपयांऐवजी १५ हजारात शौचालय बांधून मिळणार आहे. शहरातील उर्वरित शौचालयांचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याने आष्टा पालिका ही राज्यातील पहिली हागणदारीमुक्त नगरपालिका होणार आहे.
नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे म्हणाल्या, शहरात २६५० शौचालये बांधण्यात येत आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील सार्वजनिक शौचालये लवकरच पाडण्यात येणार आहेत. या सर्व नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. त्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना जागा नसल्यास जागा उपलब्ध करून योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
२६५0 अर्ज मंजूर
आष्टा शहराची लोकसंख्या ५० हजारांच्या घरात आहे. अनेक नागरिकांकडे वैयक्तिक शौचालयाची सुविधा आहे. परंतु मुख्य शहरासह उपनगरे, वाड्या-वस्त्यांवर शौचालयेच नव्हती. अशा शहरातील सर्व कुटुंबांना एक शौचालय देण्यासाठी पालिकेने घरोघरी फिरुन जनजागृती केली. स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. सुमारे २६५० कुटुंबप्रमुखांचे अर्ज पालिकेने मंजूर केले.