दिलीप मोहितेविटा : अवघ्या सहा दिवसांवर आलेला मुलाचा विवाह सोहळा... घरात लगीनघाई... निमंत्रण पत्रिका देण्याचे काम संपलेलं... मंगल सोहळ्यासाठीचे आनंदी क्षण वेचण्यात सारे गुंतलेले अन् अचानक त्यांच्या या आनंदावर ठिणगी पडली अन् मंगल क्षणांचे स्वप्न आगीत भस्मसात झाले. विट्याच्या सावरकरनगरमधील विष्णू पांडुरंग जोशी यांच्या कुटुंबीयांसाठी सोमवार हा घातवार ठरला. भांडी व फर्निचर दुकानाला भीषण आग लागून विष्णू जोशी यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनंदा, विवाहित मुलगी प्रियांका योगेश इंगळे व तिची दोन वर्षांची चिमुकली सृष्टी यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला अन् मुलाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे जोशी कुटुंबीयांचे स्वप्न अधुरेच राहिले.विटा येथील विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील सेंटर व फर्निचर या भांडी दुकानाला सोमवारी भीषण आग लागली. जोशी कुटुंब मूळचे गोकाकचे. विष्णू यांचे वडील पांडुरंग यांनी विट्यात येऊन भांडी व्यवसाय सुरू केला. त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात उतरली आहे. विट्यातील सावरकरनगरमध्ये चार मजली इमारत बांधून विष्णू जोशी यांनी व्यवसायात चांगलाच जम बसविला होता.विष्णू यांची दोन मुले मनीष व सूरज जोशी हे दोघेही व्यवसाय चांगल्या प्रकारे सांभाळत होते. त्यांचा थोरला मुलगा मनीष याचा तासगाव येथील नातेवाईक माधव कृष्णा भोसले यांच्या कन्येशी दि. १६ नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. त्याची तयारी पूर्ण झाली होती. रविवारी विष्णू, सूरज हे दोघे तासगावसह अन्य नातेवाइकांना निमंत्रण पत्रिका देऊन रात्री उशिरा घरी परत आले होते.सोमवारी सकाळी अचानक दुकानात आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.घरातून बाहेर पडण्यासाठी दुकानातूनच रस्ता असल्याने दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या जोशी कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडता आले नाही. त्यातूनही मनीष व सूरज हे दोघेही प्रसंगावधान राखून दुसऱ्या गॅलरीतून बाहेर पडले; परंतु वडील विष्णू, आई सुनंदा, गरोदर बहीण प्रियांका आणि दोन वर्षांची चिमुकली भाची सृष्टी यांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
ओल्या चादरीत चिमुकलीला गुंडाळलेआगीचा भडका उडल्यानंतर प्रियांका हिने मुलगी सृष्टी हिला मोठी चादर ओली करून त्यात गुंडाळले असावे. कारण सृष्टीचा मृतदेह चादरीत लपटलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे बचावासाठी गेलेल्या तरुणांनी सांगितले. मात्र, दुर्दैवाने प्रियांकासह तिच्या चिमुरड्या सृष्टीनेही अखेरचा निरोप घेतला.
दुसऱ्या मुलाचेही चार महिन्यांवर लग्नविष्णू जोशी यांना मनीष व सूरज हे दोन मुले. यातील मनीष याचा दि. १६ नोव्हेंबरला विवाह होता. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. दुसरा मुलगा सूरज याचाही माधवनगर येथील नातेवाईक मुलीशी साखरपुडा झाला होता. या दोघांच्या डोईवर अक्षता टाकण्याचे भाग्य नियतीने हिरावून घेतले.
तरुणांनी तोडली भिंतजोशी यांच्या इमारतीला बाहेरून एकही खिडकी नाही. त्यामुळे घरात आगीचे तांडव सुरू असल्याने अग्निशमनचे जवान आणि स्थानिक तरुणांना घरात प्रवेश करणे अवघड झाले होते. त्यामुळे तरुणांनी मोठा हातोडा, पहार, लोखंडी मोठे गज आणून भिंती तोडल्या. त्यानंतर त्यातून आत पाण्याचा मारा सुरू झाला.
मनीष व सूरज बचावलेइमारतीला आग लागल्यानंतर काही स्थानिक तरुणांनी शेजारच्या घरातील टेरेसवर जाऊन जोशी कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडण्याचे आवाहन केले. त्यावेळी मनीष व सूरज यांनी गॅलरीतून तरुणांच्या मदतीने सुखरूप सुटका करून घेतली. त्यामुळे हे दोन्ही भाऊ सुदैवाने बचावले. मात्र, आई, वडील, बहीण, भाची हे सर्वजण कायमचे निघून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
पाच तासांचा थरारविट्यातील इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी विटा, पलूस, कडेगाव, तासगाव, कुंडल येथील प्रशिक्षित अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते. पाच अग्निशमन गाड्या व शेकडो स्थानिक तरुणांच्या मदतीने पाच ते सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. पाच तासांच्या अग्नितांडवाचा थरार अंगावर शहारे आणणारा होता.
रुग्णालयात नातेवाइकांची गर्दीया भीषण आगीत दुर्दैवी मृत्यू झालेल्या चौघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा कराड रस्त्यावरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डोळ्यांदेखत कुटुंब संपलेदोन्ही मुलांना या घटनेने धक्का बसला. डोळ्यांदेखत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून त्यांचे कुटुंब संपले. अश्रुंच्या धारा त्यांच्या डोळ्यातून थांबत नव्हत्या अन् त्यांना पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले.
Web Summary : A devastating fire in Vita, Sangli, claimed four lives from the Joshi family, including a bride-to-be and her young child. The tragedy struck just days before the wedding, shattering their dreams. Two sons survived the blaze.
Web Summary : सांगली के विटा में भीषण आग में जोशी परिवार के चार लोगों की मौत हो गई, जिसमें एक दुल्हन और उसका छोटा बच्चा शामिल थे। शादी से कुछ दिन पहले हुई त्रासदी ने उनके सपनों को चकनाचूर कर दिया। आग में दो बेटे बच गए।