जयंतराव, तुम्ही केलेल्या विकासाचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:15+5:302021-01-14T04:21:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या निनाईनगरमध्ये इस्लामपूर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च ...

जयंतराव, तुम्ही केलेल्या विकासाचे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या निनाईनगरमध्ये इस्लामपूर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या विकासकामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खर्ची पडलेल्या कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड जनतेच्या खिशातून कराच्या माध्यमातून जाण्याची शक्यता आहे.
पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रभाग २ मधील निनाईनगरमध्ये जयंत पाटील स्पोर्टस क्लब, गुडमॉल व्यापारी गाळे, बगीचा आणि स्मशानभूमी रस्ते, आदी विकासकामे करण्यात आली. स्पोर्टस क्लब नगरसेवक खंडेराव जाधव यांनी ठेकेदारास चालविण्यास दिला असल्याने तो सुस्थितीत आहे. याच परिसरात असलेल्या बागेला गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी विकास आघाडी आणि पालिका प्रशासनाने बेदखल केले आहे. त्यामुळे तिची दुरवस्था झाली आहे. यावर पालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. याहून कळस म्हणजे सदरची बाग ठेकेदाराने पालिकेकडे हस्तांतरित केली नसल्याचे या प्रभागातील नगरसेवक सांगतात.
याच परिसरात १० व्यापारी गाळे बांधले आहेत. त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या परिसरातील प्रेमीयुगुले या गाळ्यांचा आधार घेतात, याची तक्रारही पोलिसांत देण्यात आली होती. याच परिसरात असलेल्या स्मशानभूमीची पडझड झाली आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे कपौंड व्हॉल्व्हला भगदाडे पाडण्यात आली आहे. बैठकीसाठी केलेल्या व्यवस्थेच्या फरशा उकलल्या आहेत. मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा आणि पाण्याचा अभाव आहे. याकडे गेल्या चार वर्षांपासून एकही पालिकेचा कर्मचारी फिरकला नाही. या प्रभागातील नगरसेवक, राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील आणि शिवसेनेचे शकील सय्यद यांनी अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून ही झालेली विकासकामे पालिका प्रशासनाने दुर्लक्षित केली आहेत.
फोटो - १३०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज
ओळ : इस्लामपूरमधील प्रभाग दोनमधील निनाईनगरमधील बगीचा आणि स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.