जयंत पाटील - आबा गटात महामंडळांसाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:37+5:302021-07-07T04:32:37+5:30

सांगली : राज्यातील महामंडळांचे पदाधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, जिल्ह्यालाही एखादे महांमडळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

Jayant Patil - Aba group for corporations | जयंत पाटील - आबा गटात महामंडळांसाठी चुरस

जयंत पाटील - आबा गटात महामंडळांसाठी चुरस

सांगली : राज्यातील महामंडळांचे पदाधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, जिल्ह्यालाही एखादे महांमडळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आर. आर. आबा व जयंत पाटील गटातील नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. जयंत पाटील यांच्या हाती निवडीच्या दोऱ्या असल्याने ते कोणाच्या पदरात पद टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रीमंडळासह महामंडळांच्या वाटपात नेहमीच सांगलीचा दबदबा राहिला आहे. एकाचवेळी तीन-चार मंत्रीपदे, दाेन-तीन महामंडळे यांच्या माध्यमातून सहा ते सात लाल दिव्याच्या गाड्या जिल्ह्याला लाभायच्या. गेल्या काही वर्षांत हा दबदबा कमी झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर जिल्ह्याचा राज्यातील हा दबदबा कमी झाला. भाजपच्या सत्ताकाळातही जिल्ह्याला फार काही मिळाले नाही.

सध्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असल्याने यात सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा दबदबा आहे. महामंडळांच्या वाटपातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे महामंडळांसाठी आतापासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. यात आर. आर. आबा गटातून ताजुद्दीन तांबोळी, जयंत पाटील गटातून माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत.

माजी महापौर व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचे नावही चर्चेत आले आहे. त्यांनी यापूर्वी खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. जयंत पाटील यांचे ते निकटवर्तीय असल्याने तसेच राजकारणात विविध पदांचा अनुभव असल्याने त्यांचेही नाव चर्चेत आहे.

महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची सत्ता असतानाही राष्ट्रवादीचा महापौर बनविण्यामध्ये मैनुद्दीन बागवान यांचे योगदान आहे. त्यांनाच महापौर बनविण्याची जयंत पाटील यांची इच्छा होती, पण काही नगरसेवकांनी त्यांच्या नावाला विरोध केल्यामुळे ऐनवेळी नाव बदलण्यात आले. त्यामुळे ही कसर आता महामंडळातून भरण्याचा प्रयत्नही जयंत पाटील यांच्याकडून होऊ शकतो.

चौकट

आबा गटाचे लक्ष

पदांच्या वाटपात आर. आर. पाटील यांच्या समर्थकांना डावलले जात असल्याची भावना नेहमीच व्यक्त होत असते. या गटात सध्या केवळ ताजुद्दीन तांबोळी यांच्याकडे प्रदेश सरचिटणीसपद आहे. दुसरीकडे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात सर्वाधिक पदे देण्यात आली आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील गटातील तांबोळी यांची वर्णी महामंडळावर लागावी म्हणून आमदार सुमनताई पाटील यांनी वरिष्ठांकडे प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: Jayant Patil - Aba group for corporations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.