निवडणूक एका प्रभागाची, अन् लागली दुसऱ्याच प्रभागात, अधिकाऱ्यांची झाली पंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 14:02 IST2021-12-11T12:48:34+5:302021-12-11T14:02:38+5:30

दुसऱ्याच जागेवर निवडणूक लागल्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे तेथील इच्छुकांनी अर्जही दाखल केले आहेत.

In Jat taluka of Sangli district due to mistake of Gram Sevak election started in the second ward | निवडणूक एका प्रभागाची, अन् लागली दुसऱ्याच प्रभागात, अधिकाऱ्यांची झाली पंचायत

निवडणूक एका प्रभागाची, अन् लागली दुसऱ्याच प्रभागात, अधिकाऱ्यांची झाली पंचायत

सांगली : बोर्गी खुर्द (ता. जत) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनची जागा रिक्त असताना ग्रामसेवकांनी प्रभाग क्रमांक दोनची जागा रिक्त असल्याची माहिती दिली आहे. यामुळे रिक्त जागा तशीच राहून दुसऱ्याच जागेवर निवडणूक लागल्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. ग्रामसेवकाच्या एका चुकीमुळे प्रशासनासमोर अडचण निर्माण झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे तेथील इच्छुकांनी अर्जही दाखल केले आहेत.

ग्रामपंचायतीमधील रिक्त जागेच्या पोटनिवडणुका आहेत. पोटनिवडणुकेसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल केले आहेत. ७ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी झाली आहे. पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा व चिन्ह वाटपही झाले आहे. मतदान २१ डिसेंबर व मतमोजणी २३ डिसेंबरला होणार आहे. पूर्व भागातील बोर्गी खुर्द ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक तीनमधील एक जागा रिक्त होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडून रिक्त जागेची माहिती मागविली होती. ग्रामसेवक अशोक बिरादार यांनी प्रभाग तीनची जागा रिक्त असताना प्रभाग दोनमधील जागा रिक्त असल्याची माहिती दिली. त्यानुसार निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

महिनाभरापूर्वी कार्यक्रम घोषित होऊन ही गंभीर चूक कुणाचाही लक्षात आली नाही. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. आत्ता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. एका ग्रामसेवकाच्या चुकीमुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मोठाच पेच निर्माण झाला आहे. तसेच जी मुख्य रिक्त जागा आहे, ती जागा पुन्हा रिक्तच राहणार की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.

ग्रामसेवकाची विभागीय चौकशी

बोर्गी खुर्दचे ग्रामसेवक अशोक बिरादार यांनी निवडणूक विभागाला चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केली आहे. तसेच रिक्त जागा नसताना तेथील निवडणूक लागली आहे. या सर्व गोंधळास बिरादार हे जबाबदार असल्यामुळे त्याची विभागीय आयुक्तांकडून चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता जिल्हा परिषद प्रशासनाने वर्तविली आहे.

Web Title: In Jat taluka of Sangli district due to mistake of Gram Sevak election started in the second ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.