जतमध्ये महावितरणचा अभियंता जाळ्यात
By Admin | Updated: August 22, 2014 23:24 IST2014-08-22T23:24:23+5:302014-08-22T23:24:23+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

जतमध्ये महावितरणचा अभियंता जाळ्यात
जत : घरगुती वीज कनेक्शन परिवर्तन करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अमीर इसाम शेख (वय २८, रा. जत) याला त्याच्या कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई आज (शुक्रवारी) दुपारी एकच्या दरम्यान जत शहर पूर्वविभाग कार्यालयात करण्यात आली.
येथील तम्मा सिंधगी (रा. मंगळवार पेठ) यांच्या आजीच्या नावे घरगुती वीज कनेक्शन आहे. ते त्यांच्या स्वत:च्या नावे परिवर्तन करून घेण्यासाठी त्यांनी महावितरणच्या जत शहर पूर्वविभाग कार्यालयात तीन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. अनेकवेळा हेलपाटे मारूनही काम होत नव्हते. अखेर कनिष्ठ अभियंता अमीर शेख याच्यासोबत त्यांनी चर्चा केली असता काम पूर्ण करण्यासाठी त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर त्यातील एक हजार कमी करून चार हजार रुपये / देण्याचे सिंधगी यांनी मान्य केले होते. त्यानंतर सिंधगी यांनी सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला याबाबत कळविले. सिंधगी यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन या विभागाने त्यांच्या कार्यप्रणालीनुसार पडताळणी केली असता शेख याने लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज, शुक्रवारी सापळा रचला. दुपारी एकच्या दरम्यान अमीर शेख याला तम्मा सिंधगी यांच्याकडून चार हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडले. शेख याचे मूळ गाव महुद बुद्रुक (ता. सांगोला, जि. सोलापूर) आहे. जत येथील शासकीय सेवेचा त्याचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. सांगोला येथील कार्यालयात जागा रिक्त झाल्यामुळे त्याने येथून बदली करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, बदली होण्यापूर्वीच तो लाच घेताना सापडला. (वार्ताहर)