जगतापांच्या टीकेने ऐक्य एक्स्प्रेसला धक्का

By Admin | Updated: April 8, 2015 00:31 IST2015-04-07T23:42:56+5:302015-04-08T00:31:51+5:30

जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी; राष्ट्रवादी नेत्यांच्या अडचणी वाढल्या

Jagtap scolds push to Aukhi Express | जगतापांच्या टीकेने ऐक्य एक्स्प्रेसला धक्का

जगतापांच्या टीकेने ऐक्य एक्स्प्रेसला धक्का

अविनाश कोळी - सांगली --जिल्हा बँकेची ऐक्य एक्स्प्रेस रुळावर येण्यासाठी सज्ज होत असतानाच, भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी काँग्रेस नेत्यांवर केलेल्या टीकेच्या माध्यमातून रुळावरच घाव घातला आहे. त्यांच्या वक्तव्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ही ऐक्य एक्स्प्रेस धावणार की रुळावरून घसरणार?, असा प्रश्न राजकीय नेत्यांना पडला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे लढविण्याबाबत राष्ट्रवादीने आवाहन केल्यानंतर काँग्रेस, भाजप नेत्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले होते. याबाबत अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर १२ किंवा १३ मार्च रोजी राष्ट्रवादीमार्फत बैठक घेऊन संयुक्त पॅनेलचा प्रस्ताव सर्व पक्षांना दिला जाणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यातील सर्वच पक्षांतील इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी पक्षीय नेत्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे विक्रमी अर्ज दाखल होत आहेत. अशातच आ. जगताप यांनी काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. सहकाराची वाट त्यांनीच लावल्याची त्यांची टीका आता काँग्रेसच्या सर्वच नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे.
ऐक्यासाठी अनुकूल असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये आता भाजपबद्दल नाराजी दिसत आहे. एकत्रित येण्याच्या प्रक्रियेवेळी जगतापांची ही टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांना सर्वाधिक डोकेदुखीची ठरणार आहे. पतंगराव आणि मोहनरावांशिवाय काँग्रेसमध्ये कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे एकत्रित पॅनेलच्या जागावाटपावेळी भाजपच्या भूमिकेवरून अडचणी येण्याची चिन्हे आहेत. जगतापांच्या टीकेमुळे ऐक्याच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कदम बंधूंच्या उपस्थितीत बिनविरोधची चर्चा करू नये, असे मत जगतापांनी व्यक्त केले असले तरी, मोहनराव आणि पतंगरावांशिवाय बिनविरोधचे घोडे पळणारच नाही. त्यामुळे या टीकेच्या धक्क्याने ऐक्य एक्स्प्रेस रुळावरून घसरली तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही, प्रामाणिक लोकांना घेऊन पॅनेल केले जाणार असेल, तर भाजपही त्याला साथ देईल, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे सर्वच पक्षांचा हिरवा कंदील बिनविरोधच्या शक्यतांनाही बळ देत होता. जगतापांनी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनाच लाल कंदील दाखविल्यामुळे या चर्चा पुन्हा फिसकटणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेसमधील अन्य पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जगताप यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हीच नाराजी जागावाटपाच्या चर्चेवेळीही पुन्हा डोके वर काढण्याची दाट शक्यता आहे.


पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांनी आजवर सहकाराला पूरक असेच कार्य केले आहे. संस्थात्मक उभारणीतून त्यांनी या गोष्टी सिद्ध केल्या आहेत. जिल्हा बँकेच्या चौकशीत काँग्रेसच्याही बऱ्याच नेत्यांची नावे आहेत. त्यामुळे कुणी स्वत:हून स्वत:ची चौकशी लावणार नाही. जगतापांची ही टीका व्यक्तिगत द्वेषातून झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत.
- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Jagtap scolds push to Aukhi Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.