सारेच आहे बंद, मग नागरिक कसे बेबंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST2021-04-18T04:24:48+5:302021-04-18T04:24:48+5:30
सांगली : अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्वकाही बंद असताना शहरांमधील हजारो नागरिकांची रस्ते, चौक, बाजारपेठांमधील भटकंती नेमकी कशासाठी सुरू ...

सारेच आहे बंद, मग नागरिक कसे बेबंद?
सांगली : अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्वकाही बंद असताना शहरांमधील हजारो नागरिकांची रस्ते, चौक, बाजारपेठांमधील भटकंती नेमकी कशासाठी सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शनिवारी सांगलीत सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांचा मुक्तसंचार सुरू होता.
लॉकडाऊन काळात एकीकडे व्यापारी, व्यावसायिकांनी सर्वांनी प्रामाणिकपणे शासनाचे निर्बंध पाळत व्यावसाय बंद केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठा, व्यावसाय बंद आहेत. तरीही नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. हजारो लोक दररोज जाताहेत तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून कारवाईत ढिलाईपणा होत असल्याने नागरिकांची संचारबंदीबद्दलची भीती मोडली आहे. या काळात नागरिक मुक्तसंचार अधिक करीत आहेत. रस्ते, चौक, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी दुचाकी व चारचाकींची वर्दळ दिसून आली. वाहने अडविताना व संबंधितांना विचारणा करतानाचे चित्र अपवादात्मक होते.
दवाखान्याला जायचेय, किराणा माल खरेदी करायचा आहे, नातेवाइकांच्या घरी कार्यक्रम आहे, कामावर जात आहे, कुत्र्याला बरे नाही, औषध आणायचे आहे, अशी एक ना अनेक कारणे देत लोक भटकंती करीत आहेत.
चौकट
बेकऱ्या, किराणा दुकाने बंद
शनिवार व रविवारचा कडक लॉकडाऊनचा नियम कायम असल्याचा ग्रह करून अनेक बेकरीचालक व किराणा दुकानदारांनी शनिवारी व्यवसाय बंद ठेवला होता. त्यामुळे शनिवारी केवळ मेडिकल्स, पेट्रोलपंप, दवाखाने, अन्य वैद्यकीय सेवा इतकेच सुरू होते.
चौकट
श्वानासह भटकंती, घोडागाडी रपेट
संचारबंदी व लॉकडाऊन काळात दररोज सायंकाळी शहराच्या कानाकोपऱ्यात ट्रॅक पँट घालून श्वानासह भटकंती करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी रात्री माधवनगर रोडवर काही मुलांनी घोडागाडी पळविण्याचा आनंद लुटला. अशा कोणत्याही लोकांवर निर्बंध नाहीत.
चौकट
मागील संचारबंदी कडक
गतवर्षी राबविण्यात आलेली संचारबंदी कडक होती. रस्ते, चौक, बाजारपेठा पूर्णपणे ओस पडल्या होत्या. रस्त्यावर दिसणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. यंदा नेमकी उलटी परिस्थिती आहे. संचारबंदीत मुक्तसंचार अधिक दिसत आहे.