महाविकास आघाडीसोबत गेलो ही चूकच, यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्रच लढणार- राजू शेट्टी
By अशोक डोंबाळे | Updated: February 17, 2023 20:30 IST2023-02-17T20:29:23+5:302023-02-17T20:30:59+5:30
'लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रच लढणार.'

महाविकास आघाडीसोबत गेलो ही चूकच, यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्रच लढणार- राजू शेट्टी
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढत होती, तेव्हा लोक ताकदीने आमच्यासोबत उभे होते. आम्ही महाविकास आघाडीसोबत गेलो ती आमची चूक होती, ती पुन्हा होणार नाही. आम्ही आता स्वतंत्रच लढू, अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत मांडली.
शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीसोबतचे संबंध एक वर्षापूर्वीच तोडले आहेत. त्यावर पुनर्विचार करावा, अशी गरज आम्हाला वाटत नाही. संबंध तोडणे चुकीचे होते, असेही आम्हाला वाटत नाही. कारण, प्रत्येक सरकारने आणि पक्षाने आमच्या भूमिकांना बगल दिली आहे.
शेतकरी हिताला बाधा येईल, अशीच धोरणे राबविली आहेत. त्याविरुद्धची लढाई स्वतंत्रपणे सुरू राहील. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणेच लढणार आहोत. आघाड्यांच्या भानगडीत पडणे ही आमची चूक होती. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या आघाड्यांमध्ये आम्ही थेट सहभागी होणार नाही. या आघाड्यांच्या भानगडींमुळे आमचे नुकसान झाले आहे.
ठाकरेंनी हात पुढे केला तरी आम्ही स्वतंत्रच राहू
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील छोटे पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी हात पुढे केला तर विचार करणार का, या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, आता कोणत्याच पक्षावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे पुन्हा ती चूक करणार नाही. कोणत्याच आघाड्यांत सहभागी होणार नाही.