बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे अशक्य

By Admin | Updated: August 31, 2015 21:43 IST2015-08-31T21:43:10+5:302015-08-31T21:43:10+5:30

विकास आराखडा अंतिम टप्प्यात : इस्लामपूर पालिकेतील नगररचना विभागाचा भोंगळ कारभार

It is impossible to hammer on illegal construction | बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे अशक्य

बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे अशक्य

अशोक पाटील - इस्लामपूर  --इस्लामपूरचा नियोजित विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. याचाच फायदा घेऊन सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने बिल्डर, धनदांडग्यांना बेकायदेशीर बांधकामासाठी अभय दिले आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांतील काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील हजारो बेकायदेशीरपणे बांधकामांवर हातोडा मारणे हे सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान असणार आहे.इस्लामपुरात १९८० नंतरच्या नियोजित विकास आराखड्याला अंतिम परवाना मिळवणे मोठे आव्हान ठरत आहे. नगरपालिकेच्या नगररचना विभागात सर्वसामान्यांना गुंठेवारी नियमितीकरण आणि बांधकाम परवान्यासाठी नगररचना विभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. तेथे एजंटांचा सुळसुळाट आहे. या एजंटांकरवीच गुंठेवारीत बांधकाम परवाना दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बांधकाम परवाना न घेताच घर बांधणे पसंद करतात. सध्या शहरात हजारो बांधकामे झाली आहेत, तसेच नवीन सुरू आहेत. गुंठेवारी नियमित असलेल्या भूखंडावरही पालिकेचा परवाना न घेता बांधकामे करण्यात आली आहेत. अशा बांधकामांनाही नगररचना विभागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. अशी बांधकामे काढणे म्हणजे सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे.
शहरातील काही प्रभागातील रस्त्यांची शिल्लक असलेली जागाही भूखंड माफियांनी बेकायदेशीरपणे विकली आहे. त्यामुळे आगामी काळात रस्ते आणि गटारी करणे पालिकेपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. काहींनी रस्त्यावरच बेकायदेशीरपणे बांधकामे केली आहेत. अशा मालमत्ताधारकांनाही प्रशासनाने अभय दिले आहे. ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ असे चित्र असल्याने बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे सत्ताधाऱ्यांना अशक्यप्राय ठरणार आहे. तरीही नगरपालिका प्रशासनाची बेकायदा बांधकामाबाबतची भूमिका येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे.


शहरातील बेकायदा बांधकाम हे सत्ताधाऱ्यांचे पाप आहे. गुंठेवारी नियमित करणे व बांधकाम परवाना मिळवण्यासाठी नगररचना विभागाची पायरी चढणे सर्वसामान्यांना अशक्य आहे. याचाच परिणाम शहरातील विनापरवाना बांधकाम वाढण्यावर झाला आहे. शासन निर्णयानुसार त्यांच्यावर ठराविक दंडात्मक कारवाई करून बांधकाम कायम करावे.
-विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.


...जेथे नगराध्यक्षच कायदा मोडतात
इस्लापूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी पूर्वी कागदपत्रांचा घोटाळा करून स्वत:चेच बांधकाम बेकायदेशीरपणे केल्याची तक्रार माजी नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे. जेथे नगराध्यक्षच कायदा मोडून बांधकाम करतात, तर सर्वसामान्यांनी असे बांधकाम केले तर काय बिघडले, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: It is impossible to hammer on illegal construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.