लाडेगाव (ता. वाळवा) येथे स्मशानभूमी कामाची पाहणी जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, सरपंच रणधीर पाटील व उपसरपंच अरविंद देसाई यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वशी : रणधीर पाटील यांच्यासारखे सरपंच लाभणे हे गावचे भाग्यच आहे, असे नेतृत्व गावागावामध्ये तयार होणे काळाची गरज आहे. गावाच्या कामासाठी विनामोबदला आपली जागा देणे ही सोपी बाब नाही, त्याला दातृत्वच अंगी असावं लागतं, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील यांनी स्मशानभूमी कामाची पाहणी करण्यासाठी आले असता काढले.
लाडेगाव (ता. वाळवा) येथे गावठाण जागा नसल्यामुळे स्मशानभूमीला जागा मिळत नव्हती. त्यामुळे गाव स्थापनेपासून गावाला स्मशानभूमी नव्हती. गावामध्ये निधन होणाऱ्या व्यक्तीच्या शेतामध्ये अंतिम विधी केला जात असे. विशेष करून पावसाळ्यामध्ये अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना अतिशय त्रास होत असे. स्मशानभूमीची गरज ओळखून लाडेगावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर पाटील यांनी गावालगत असणाऱ्या आपल्या शेतीमधील २ गुंठे जागा स्मशानभूमीसाठी दान दिली. त्यामुळे स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न सुटला आहे.
सरपंच रणधीर पाटील यांनी जनसुविधा योजनेमधून स्मशानशेड व संरक्षक भिंत बांधून मिळण्यासाठी अर्ज जिल्हा परिषदेकडे पाठवला. त्याला जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील यांनी शिफारस करून १२ लाखांचा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे लगेचच कामाला सुरुवात होऊन स्मशानशेडचे काम पूर्ण झाले. सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. त्यामुळे एक ते दोन महिन्यात अंतर्गत कामे होऊन अद्ययावत अशी स्मशानभूमी तयार होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात व इतरवेळी ग्रामस्थांना होणारा त्रास कमी होणार आहे.
स्मशानभूमीचा प्रश्न सुटल्यामुळे सरपंच पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.