राष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 03:21 PM2019-08-03T15:21:49+5:302019-08-03T15:23:30+5:30

अशोक पाटील  इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ...

Islampur rally for the emergence of Nationalist | राष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते

राष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचे वलय कायम

अशोक पाटील 

इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे वलय कायम आहे. त्यामागचे गमक जाणून घेण्यासाठी आणि राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आ. पाटील, आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात गुरुवारी खलबते झाली.

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी शरद पवार इस्लामपुरात आले होते. राजारामबापूप्रेमींची गर्दीने भरपावसातही सभामंडप खचाखच भरला होता, राष्ट्रवादीच्या पडझडीमध्येही जयंत पाटील यांचे वलय कायम असल्याचे पाहून शरद पवार भावूक झाले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या भावनिक भाषणामुळे सारा सभामंडप स्तब्ध झाला. यावेळी पवार यांचेही डोळे पाणावले. त्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देता येईल का, याबाबत पवार, आ. पाटील आणि आ. आव्हाड यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही इस्लामपूर मतदारसंघात आ. जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का लागला नाही.

जिल्ह्यात राष्ट्रवादीला ग्रहण लागले. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्येही भाजपने पाय रोवले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला खीळ बसली. लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यश मिळाले. येथून काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांचा पराभव झाला असला तरी, इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातून शेट्टी यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. शेट्टींचा पराभव लक्षात घेता आता आ. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे.

आ. जयंत पाटील यांच्याकडे भविष्यात राज्याचे नेतृत्व येईल, असे सूतोवाच राजारामबापूंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात शरद पवार यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीमधील खासदार, आमदार भाजपकडे वळवण्याचा सपाटा लावला आहे. यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतील ही गळती थांबविण्याची जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर आली आहे. ही जबाबदारी ते कितपत पेलतात, हे येत्या दोन महिन्यांत समजणार आहे.

Web Title: Islampur rally for the emergence of Nationalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.