अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आगामी नगरपालिका निवडणूक महाडिक गटाच्या समर्थकांनी कमळाच्या चिन्हावर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर पालिकेतील गटनेते विक्रम पाटील, विकास आघाडीतील शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, तर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मौन पाळले आहे. त्यामुळे निवडणुका येण्याआधीच कमळ चिन्हाला बगल मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सर्व पक्ष विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आले होते. त्या आघाडीतील शिवसेनेने धनुष्यबाणावर निवडणूक लढवली आणि अस्तित्व दाखविले. सभागृहात त्यांचे पाच नगरसेवक आहेत. आता या विकास आघाडीतील महाडिक गटाचे समर्थक माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक आणि विद्यमान नगरसेवक अमित ओसवाल यांनी आगामी पालिका निवडणूक कमळ चिन्हावर लढविणार, असे जाहीर केले आहे. यावर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
पालिकेतील विकास आघाडीचे गटनेते, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विक्रम पाटील म्हणाले की, भाजपच्या स्थापनेपासून वाळवा तालुक्यात अनेक कार्यकर्ते दिवंगत अशोकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आहेत. ते जयंत पाटील गटाच्या दबावाला कधीच घाबरले नाहीत. याच ताकदीवर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३५ हजार मते पडली. जयंत पाटील गटाने भाजप कार्यकर्त्यांच्या मालमत्तेवर नांगर फिरविला, तरीही हे कार्यकर्ते डगमगले नाहीत. नगरपालिकेत जयंत पाटील पर्यायाने राष्ट्रवादीविरोधात असलेले सर्व गट भाजपच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. यामध्ये उरुण परिसरातील नेत्यांचे मोठे योगदान आहे. आगामी निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढविणार असल्याची मागणी कोणी केली, याची कल्पना नाही. याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाही.
भाजपचे नेते तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पालिका निवडणुकीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले.
शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी विकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे.
सत्ताधारी विकास आघाडीतील या सर्वांची भूमिका पाहता निवडणुका येण्याआधीच कमळ चिन्हाला बगल मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोट
इस्लामपूर शहरात शिवसेनेची ताकद स्वतंत्र आहे. आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधातील सर्वच नेत्यांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या पद्धतीने आता विकास आघाडीची वाटचाल सुरू आहे.
-आनंदराव पवार, शिवसेना गटनेते