इस्लामपूर पालिका सभेत टक्केवारीवरून खडाजंगी
By Admin | Updated: July 29, 2014 22:58 IST2014-07-29T22:19:05+5:302014-07-29T22:58:20+5:30
आरोप-प्रत्यारोप : विरोधी-सत्ताधारी नगरसेवकांचा एकमेकांवर निशाणा

इस्लामपूर पालिका सभेत टक्केवारीवरून खडाजंगी
इस्लामपूर : शहरातील रस्ते विकसित करण्याच्या विषयावर विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी टक्केवारीचा आरोप करताच सत्तारूढ गटाचे सदस्य त्यांच्यावर तुटून पडले. त्यांच्यातील शाब्दिक खडाजंगीने ऐन गारव्यातही सभागृहातले वातावरण तापले होते. कुंभार यांनी, सत्ताधाऱ्यांनी खा. राजू शेट्टी यांचा निधी वापरल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी तो निधी शेताकडच्या रस्त्यावर गेला, असे प्रत्युत्तर देतानाच रस्ते कामाचे लाखाचे अंदाजपत्रक करताना शेट्टींच्या निधीला कुणाची टक्केवारी लागली, असा पलटवार कुंभार यांच्यावर केला.
पालिका सभागृहात आज मंगळवारी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष संजय कोरे, मुख्याधिकारी निलेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा झाली. सभेत तीन विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी चौथ्या वित्त आयोगाला शिफारशी करण्याच्या विषयावर ज्येष्ठ सदस्य बी. ए. पाटील यांनी पारदर्शी व विकासाभिमुख कारभारासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या, तर अरुणादेवी पाटील यांनीसुध्दा सूचना केल्या.
सभेतील पहिल्याच रस्ते विकासाच्या विषयावर पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी १५ दिवसांपूर्वी शहरातील रस्ते विकासासाठी २ कोटी ५0 लाख व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी १ कोटी ५0 लाखांचे अनुदान मिळाले आहे. रस्ते कामासाठी निधी कमी पडणार नाही आणि निधी कमी पडलाच, तर विरोधी नगरसेवक कपिल ओसवाल आहेतच, असा रेशीम चिमटा काढला. त्यानंतर विजय कुंभार यांनी आझाद चौक ते शिराळा नाका या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा ठराव द्या, अशी मागणी केली. त्यावर सत्तारूढ गटाच्या खंडेराव जाधव, अॅड. चिमण डांगे, शंकरराव चव्हाण, शुभांगी शेळके यांनी कुंभार यांच्या व्यक्तव्याला जोरदार हरकत घेतली. जाधव म्हणाले, शहरातील सर्व रस्ते विकसित करण्यासाठी नगरपालिका सक्षम आहे. शहरातील रस्त्यांची परिस्थिती बघून जयंत पाटील यांनी हा निधी मिळवून दिला आहे. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, अशी मागणी केली, तर डांगे यांनी कपिल ओसवाल ज्या प्रभागातून निवडून आलेत, तेथील रस्त्यांचे बघावे, असा टोला मारला. शेवटी बी. ए. पाटील यांनी हा प्रकार औचित्यभंगाचा असल्याने मूळ विषयावर चर्चा करा, अशी सूचना केली.
या चर्चेतील खडाजंगीत कुंभार यांनी टक्केवारीने कामे होत असल्याचा आरोप करताच सभागृहात पुन्हा वादंग माजले. विजयभाऊ पाटील यांनी, जे काम आम्ही साडेतीन लाखांत बसवले तेवढेच काम तुम्ही शेट्टींच्या निधीतून ७ लाखांत बसवले. मग त्यात टक्केवारी कुणाची, हे जाहीर करा, असे सुनावले. त्यावर कुंभार यांनी विजयभाऊंना तुम्हीसुध्दा शेट्टींचा निधी वापरला आहे, असा पलटवार करताच तो निधी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर खर्ची पडल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
घरकुल वाटपाच्या विषयावर सत्तारूढ सदस्यांनी लाभार्थ्यांकडून त्याचा पूर्ण हिस्सा भरून घेणे व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावरच घरकुलाचे वाटप करा, अशा सूचना केल्या. (वार्ताहर)