इस्लामपुरात डोक्यात वीट घालून एकाला जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:20+5:302021-06-20T04:19:20+5:30
इस्लामपूर : येथील कापूसखेड स्मशानभूमीलगत असणाऱ्या घरकुल योजनेतील इमारतीच्या परिसरात पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाचे विटेने डोके फोडून ...

इस्लामपुरात डोक्यात वीट घालून एकाला जबर मारहाण
इस्लामपूर : येथील कापूसखेड स्मशानभूमीलगत असणाऱ्या घरकुल योजनेतील इमारतीच्या परिसरात पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाचे विटेने डोके फोडून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. तसेच आणखी दोघांना मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. यातील गंभीर जखमीला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
शंकर संपत साळुंखे (वय २६, रा. कापूसखेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद शनिवारी पोलिसात दाखल झाली. त्यानुसार पुष्पक नायकवडी आणि सुरज बाबर या दोघांसह त्यांच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नायकवडी आणि बाबर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साळुंखे व चौघे हल्लेखोर हे घरकुल इमारत परिसरात मद्यपान करत बसले होते. काहीवेळाने पूर्वीच्या भांडणाच्या रागातून साळुंखे याच्या डोक्यात वीट मारून त्याला जखमी केले. यावेळी तेथे आलेल्या अनिकेत धुमाळ आणि आनंदा कोळी या साळुंखेच्या दोन मित्रांनाही मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. हवालदार अमोल चव्हाण अधिक तपास करत आहेत.