आयर्विन पूल २३ पासून महिनाभरासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:33 IST2021-02-17T04:33:10+5:302021-02-17T04:33:10+5:30
सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पूल २३ फेब्रुवारी ते २४ मार्च या एक महिन्याच्या कालावधीसाठी वाहतुकीस बंद राहणार आहे. ...

आयर्विन पूल २३ पासून महिनाभरासाठी बंद
सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पूल २३ फेब्रुवारी ते २४ मार्च या एक महिन्याच्या कालावधीसाठी वाहतुकीस बंद राहणार आहे. या पुलावरील फूटपाथच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी या पुलावरील वाहतूक सांगली-इस्लामपूर बायपास रस्त्यावर वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी दिले.
कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला ९१ वर्षे पूर्ण झाली आहे. मध्यंतरी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले. यात पुलाची स्थिती भक्कम असल्याचे सांगण्यात आले. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. केवळ दुचाकी व लहान वाहनांचाच पुलावरून प्रवेश दिला जात आहे. त्यातच या पुलाच्या फूटपाथला अनेकदा भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी करून फूटपाथची दुरूस्ती करण्यात आली होती. पुलाला संभाव्य धोका पाहता, त्याच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत होती. त्यानुसार बांधकाम विभागाने फूटपाथच्या दुरुस्तीसाठी इपोक्सी ट्रीटमेंट व लोखंडी अँगलच्या वेल्डिंगच्या कामाची निविदा काढली होती. या ठेकेदाराला वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. दुरुस्तीचे हे काम २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हे काम महिनाभर चालणार आहे. त्यासाठी या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवली जाणार आहे.
ही वाहतूक सांगली-इस्लामपूर बायपास रस्त्याकडे वळविण्यात आली आहे. आयर्विनवरील वाहतूक बंद केल्याची माहिती जनतेला व वाहनचालकांना व्हावी, यासाठी दिशाचिन्हे लावण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम व आरटीओ कार्यालयांना दिली आहे.