जिल्हा बँकेतील जुन्या गैरव्यवहारांची चौकशी सुरु; सहकार विभागाचे आदेश
By अविनाश कोळी | Updated: November 4, 2023 21:26 IST2023-11-04T21:26:20+5:302023-11-04T21:26:30+5:30
जिल्हा उपनिबंधकांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती

जिल्हा बँकेतील जुन्या गैरव्यवहारांची चौकशी सुरु; सहकार विभागाचे आदेश
सांगली : जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळाच्या कालावधीतील कारभाराची सहकार कायद्यातील कलम ८३ अन्वये चाैकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेतील जुन्या कारभाराबाबत स्थगित केलेली चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर स्थगिती उठविली गेली. चौकशी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विभागीय सहनिबंधक डी.टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील पथकात विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांचा समावेश होता. या समितीने त्यांचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. सहकार आयुक्तांनी या अहवालाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ (१) व नियम ७१ अन्वये चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी जिल्हा उपनिबंधकांना प्राप्त झाले आहेत.
सर्वपक्षीय संचालकांची चिंता वाढली
ज्या काळातील कारभाराची चौकशी करण्यात आली त्या काळात सर्वपक्षीय पॅनल सत्तेवर होते. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या सर्वांचा समावेश होता. त्यामुळे या चौकशीने त्यांची चिंता वाढली आहे.