शुभम गुप्ता यांच्या सांगलीतील कारभाराची चौकशी करा - संजय पाटील 

By घनशाम नवाथे | Updated: June 13, 2025 16:19 IST2025-06-13T16:19:12+5:302025-06-13T16:19:44+5:30

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार

Investigate the affairs of then Commissioner Shubham Gupta in Sangli says Sanjaykaka Patil | शुभम गुप्ता यांच्या सांगलीतील कारभाराची चौकशी करा - संजय पाटील 

शुभम गुप्ता यांच्या सांगलीतील कारभाराची चौकशी करा - संजय पाटील 

घनशाम नवाथे 

सांगली : महापालिकेतील उपायुक्त वैभव साबळेला अटक केल्यानंतर तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कारनाम्यांची माहिती बाहेर येत आहे. त्यांनी येथील पदभार घेतल्यानंतरच्या सर्व कारभाराची, अर्थव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार असल्याची माहिती माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, तत्कालीन आयुक्त गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मर्यादा सोडून काही गोष्टी केल्या आहेत, त्या धक्कादायक आहेत. कोणतेही काम पैसे घेल्याशिवाय होत नसल्याच्या नागरिक आणि विविध उद्योगात काम करणाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. आयुक्त गुप्ता यांचा कारभार हा अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेला राहिला आहे. त्यांनी जिल्हा बँकेसह इतर संस्थानादेखील सोडले नाही.

गुप्ता यांच्या व्हॉट्सॲप कॉलची चौकशी करावी. त्यामधून भ्रष्टाचार समोर येईल. फाइल का थांबत होत्या, अडवणूक का होत होती, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आदींना त्रास झाला. त्यांनी अनेकांचे शोषण करण्याचा प्रकार केला. परंतु तो खपवून घेणार नाही. त्यामुळेच गुप्ता यांची चौकशी करण्याची मागणी करत आहे.

..त्यावेळी विशाल पाटील यांनी केली होती पाठराखण

पाटील पुढे म्हणाले, शासनाच्या आदिवासी विकास विभागाने आयुक्त गुप्ता यांची चौकशी करून त्यांच्यावर ठपका ठेवला होता. अशा अधिकाऱ्यांवर वचक बसवून प्रशासकीय यंत्रणेला आदर्श घालून देणे गरजेचे आहे. आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराचे आरोप आयुक्त गुप्ता त्यांच्यावर होताना खासदार विशाल पाटील यांनी पाठराखण केली होती.

मात्र अशा कारभाराला त्यांचे समर्थन असेल असे वाटत नाही. लोकप्रतिनिधींचा वचक असणाऱ्या जिल्हा बँकेला बांधकाम परवानगीसाठी लाखो रुपये लाच द्यावी लागते हे दुर्दैव आहे. वैभव साबळे हा छोटा मासा असून, मोठा मासा गळाला लागला पाहिजे.

शेती नुकसानीचे पंचनामे करा

जिल्ह्यात पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला उत्पादक आणि जिरायत शेतीचे नुकसान झाले आहे. ओढ्यातून काही जनावरे वाहून गेले आहेत. नुकसानग्रस्त शेतीचे शासनाने पंचनामे करून भरीव मदत करावी, अशी मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Investigate the affairs of then Commissioner Shubham Gupta in Sangli says Sanjaykaka Patil