आज ‘स्थायी’सह विशेष समितीच्या मुलाखती
By Admin | Updated: December 19, 2014 00:12 IST2014-12-18T23:38:17+5:302014-12-19T00:12:21+5:30
उद्या बैठक : फरास, पुरेकर यांची नावे आघाडीवर

आज ‘स्थायी’सह विशेष समितीच्या मुलाखती
कोल्हापूर : महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या आठ, महिला बालकल्याण समितीच्या नऊ, परिवहन समितीच्या सहा नव्या सदस्यांची निवड शनिवारी (दि. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाच्या कोट्यातील समिती सदस्यांसाठी इच्छुकांच्या मुलाखती उद्या, शुक्रवारी होणार आहेत. शासकीय विश्रामगृहावर सायंकाळी पाच वाजता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती होतील. राष्ट्रवादीच्या वाट्याला सभापतिपद असल्याने या मुलाखतीबाबत उत्सुकता आहे. ‘स्थायी’साठी काँग्रेस, शिवसेना-भाजपचे प्रत्येकी एक नाव सभागृहातच जाहीर होऊ शकते.
सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल फरास मागीलवेळी इच्छुक होते. त्यावेळी नेत्यांनी ‘शब्द’ दिल्याने फरास रिंगणातून बाहेर पडले होते. राजू लाटकर व रमेश पोवार यांना सहा-सहा महिन्यांसाठी नेत्यांनी संधी दिली. दरम्यान, महापौरपदासाठी डावललेल्या ‘जनसुराज्य’च्या मृदूला पुरेकर यांनीही स्थायी सभापतिपदासाठी फिल्डिंग लावली आहे. पुरेकर सभापती झाल्यास त्या ‘पहिल्या महिला सभापती’ ठरणार आहेत. माजी मंत्री विनय कोरे पुरेकर यांच्यासाठी किती ताकद लावतात यावर त्यांचे सभापतिपद अवलंबून आहे. उपमहापौरपद घेण्यास पुरेकर या इच्छुक नसल्याची चर्चा आहे.
स्थायी समिती सभापतीची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. परिवहन समितीसह महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांसह सभापतींची निवड जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी दहा महिन्यांसाठी महापौरपदाबरोबरच परिवहन सभापती व महिला व बालकल्याण सभापतिपद काँग्रेसकडे राहणार आहे, तर स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या जोडीला प्राथमिक शिक्षण सभापती व उपमहापौर हे पद राष्ट्रवादीकडे असणार आहे.
राजू घोरपडे, राजू लाटकर, महेश गायकवाड, सुनील पाटील, सतीश लोळगे, यशोदा मोहिते, राजू हुंबे व सुभाष रामुगडे या आठ स्थायी समिती सदस्यांची मुदत २० डिसेंबरला संपत आहे. तसेच परिवहन समिती सभापती वसंत कोगेकर, राजाराम गायकवाड, रेखा पाटील, स्मिता माळी, रेखा आवळे, सतीश लोळगे यांच्या जागी नवीन सदस्यांना संधी मिळणार आहे.
‘स्थायी’चे निवृत्त सदस्य
राजू घोरपडे, राजू लाटकर, महेश गायकवाड, सुनील पाटील, सतीश लोळगे, यशोदा मोहिते, राजू हुंबे व सुभाष रामुगडे
परिवहन समिती (काँग्रेस)
सभापती वसंत कोगेकर, राजाराम गायकवाड, रेखा पाटील, स्मिता माळी, रेखा आवळे, सतीश लोळगे.
नव्या निवडी अशा :
महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांसह सभापतींची नव्याने निवड होणार आहे. त्यामध्ये चार काँग्रेस, तीन राष्ट्रवादी, एक जनसुराज्य व सेना-भाजप प्रत्येकी एक याप्रमाणे सदस्य निवड केली जाणार आहे. सभापती काँग्रेसचा असेल. या पदी नगरसेविका लीला धुमाळ यांचे नाव आघाडीवर आहे.