सांगली जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा कवच, सर्वसाधारण सभेतील आणखी घोषणा..जाणून घ्या
By अशोक डोंबाळे | Updated: September 15, 2023 18:27 IST2023-09-15T18:24:13+5:302023-09-15T18:27:51+5:30
सांगली : जिल्हा बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याच्या कर्जाला तीन वर्षासाठी दोन लाख रुपयांचे ...

सांगली जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा कवच, सर्वसाधारण सभेतील आणखी घोषणा..जाणून घ्या
सांगली : जिल्हा बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याच्या कर्जाला तीन वर्षासाठी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केली. याशिवाय मयत शेतकऱ्याच्या दोन पाल्यास प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच शेती कर्जाच्या वसुलीसाठी सुरू केलेली एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
सांगलीतील धनंजय गार्डनमध्ये जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, मोहनराव कदम, विशाल पाटील, संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड, सुरेश पाटील, तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, वैभव शिंदे, ॲड. चिमण डांगे, बी. एस. पाटील, बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, अनिता सगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते. यावेळी यंदा १०० टक्के कर्ज वसुली केलेल्या सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांचा सत्कार केला.
मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांची संख्या दोन लाख ९० हजार इतकी आहे. या सर्व शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेकडून विमा उतरविण्यात येणार आहे. हप्त्याची रक्कम बँक भरणार असून कर्जदार शेतकऱ्यांना तीन वर्षासाठी अपघात विमा म्हणून दोन लाखाचे संरक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या दोन पाल्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदतही देण्यात येईल. अद्यापही अनेक शेतकऱ्यांची थकबाकी कायम आहे. त्यामुळे उर्वरित शेतकरी ओटीएस योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.