तासगाव : कण्हेर धरणातून आरफळ कालव्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील पलूस, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांना पाणी मिळते. मात्र ३.८३ टीएमसी पाणी प्रस्तावित असताना केवळ दोन ते अडीच टीएमसी एवढेच पाणी आमच्या वाट्याला मिळते. आरफळच्या पाण्याबाबतीत सांगली जिल्ह्यावर अन्याय होतोय, अशी लक्षवेधी आमदार रोहित पाटील यांनी आज विधानसभेत मांडली. त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी दखल घेत योग्य त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.विधानसभेत लक्षवेधी मांडताना आमदार रोहित पाटील म्हणाले, आमच्या जिल्ह्याला पाणी देताना नेहमीच अन्याय होतो. याबाबतीत जलसंपदा विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सांगली जिल्ह्याला हक्काचे पाणी न मिळण्याची अनेक कारणे आहेत. काही तांत्रिक कारणेही आहेत. पलूस तालुक्यात भूसंपादनासाठी २०० कोटी रुपये व लाइनिंगसाठी ४० कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र शेतकऱ्यांना हे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांकडून कॅनॉल मुजवण्याची भूमिका घेतली जाते. त्यामुळे पाणी पुढे येत नाही.हक्काचे पाणी, जमिनीचा मोबदला द्या..२०१४ मध्ये पाण्याच्या आरक्षणाबाबत शासन निर्णय झाला आहे. मात्र, आजतागायत आमच्या जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळत नाही. याशिवाय भूसंपादन प्रक्रियेचे ३८५ हेक्टरचे निवाडे झाले आहेत. तर सुमारे ४०० हेक्टरचे निवाडे अद्याप झाले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना कराव्यात. शेतकऱ्यांना हक्काचे पाणी, त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.
आरफळच्या पाण्याबाबतीत सांगली जिल्ह्यावर अन्याय, रोहित पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:43 IST