अॅपेक्समधील गैरप्रकारांची रुग्णांच्या नातेवाइकांकडून माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:20+5:302021-06-28T04:19:20+5:30
रुग्णालयचालक डॉ. महेश जाधव याचे भाऊ मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ मदन जाधव व रुग्णालयातील तंत्रज्ञ बसवराज कांबळे या ...

अॅपेक्समधील गैरप्रकारांची रुग्णांच्या नातेवाइकांकडून माहिती
रुग्णालयचालक डॉ. महेश जाधव याचे भाऊ मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ मदन जाधव व रुग्णालयातील तंत्रज्ञ बसवराज कांबळे या दोघांची पोलीस कोठडी संपत असल्याने सोमवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यांत येणार आहे. मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयचालक डाॅ. जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूसह दहा जणांना अटक केली आहे.
अॅपेक्सप्रकरणी डाॅ. जाधव याचे भाऊ सांगलीतील मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मदन जाधव व इसीजी तंत्रज्ञ बसवराज कांबळे यांनी डॉ. महेश जाधव यास मृत रुग्णांच्या खोट्या उपचाराची कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत केल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अटक केलेल्या डाॅ. मदन जाधव व कांबळे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यांत येणार आहे. अॅपेक्सप्रकरणी आणखी दोन डाॅक्टरांना पोलीस ठाण्यात पाचारण करून त्यांची चाैकशी करण्यात आली आहे. पोलिसांच्या अटकसत्रामुळे सांगली मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
चाैकट
अॅपेक्स रुग्णालयास नियमबाह्य परवाना देण्यात आल्याचे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी नाकारले आहे. महापालिकेने नियमानुसार पडताळणी करूनच अॅपेक्सला परवानगी दिल्याचा त्यांनी दावा केला. याप्रकरणी गुन्ह्याचा तपास पोलीस उत्तम करीत आहेत. महापालिकेने ॲपेक्स रुग्णालयास एका कागदावर परवानगी दिलेली नाही. काही लोकांनी माहिती अधिकार अंतर्गत केवळ एकच कागद मिळवून त्याआधारे दावा करीत आहेत. मात्र मी स्वतः रुग्णालयाची फाइल तपासली आहे. महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी परवानगी देताना रुग्णालयाकडून सर्व माहिती प्राप्त केली होती. यामुळे एका कागदाच्या आधारे महापालिकेने या रुग्णालयास परवानगी दिली असे होत नसल्याचेही आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.