सांगलीतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये चलाखीच अधिक; कोट्यवधींची उलाढाल, तरी रुग्णसेवेत हात आखडता

By संतोष भिसे | Updated: April 9, 2025 15:53 IST2025-04-09T15:53:25+5:302025-04-09T15:53:58+5:30

संतोष भिसे सांगली : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर सांगली जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या रुग्णसेवेविषयीदेखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

Information about services is not provided in charitable hospitals in Sangli | सांगलीतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये चलाखीच अधिक; कोट्यवधींची उलाढाल, तरी रुग्णसेवेत हात आखडता

सांगलीतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये चलाखीच अधिक; कोट्यवधींची उलाढाल, तरी रुग्णसेवेत हात आखडता

संतोष भिसे

सांगली : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर सांगली जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या रुग्णसेवेविषयीदेखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांत धर्मादाय रुग्णालयांनी ६८०० रुग्णांवर विनाशुल्क किंवा मोफत उपचार केले आहेत.

धर्मादाय श्रेणीखाली जिल्हाभरात २९ रुग्णालयांची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांवर मोफत उपचारांसाठी १० टक्के बेड राखीव ठेवण्याचा नियम आहे; पण सर्रास रुग्णालयांत याची माहिती दिली जात नाही. यामुळे गरीब व गरजू रुग्ण योजनेपासून वंचित राहतात.

रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा गरीब व निर्धनांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. या योजनेतील रुग्णांना उपचार, जेवण, कपडे, बेड व डॉक्टरची सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात द्याव्या लागतात. अशा रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यासही मनाई आहे. या योजनेवर नियंत्रणासाठी जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्तांसह जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी आदींची समिती काम करते.

सवलतीत किंवा मोफत उपचार मिळाले नसल्याबाबत धर्मादायकडे तक्रार करता येते. विशेष म्हणजे ठरावीक खासगी रुग्णालयांविरोधातच सातत्याने तक्रारी दाखल झाल्या आहेत. चौकशीअंती तक्रारी फेटाळल्या असल्या, तरी त्यामध्ये रुग्णालयांची चलाखीच जास्त आहे.

या रुग्णांवर उपचारांमध्ये सवलत

  • वार्षिक उत्पन्न १.८० लाख असणारे (मोफत)
  • वार्षिक उत्पन्न ३.६० लाख असणारे (सवलतीत)
  • याचा लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिका, दारिद्र्यरेषेखाली नाव किंवा तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते.


धर्मादायचा नियम काय सांगतो?

धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयावर ‘धर्मादाय’ असा ठळक उल्लेख अपेक्षित आहे. गरीब व निर्धन रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव असल्याचा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. या योजनेची माहिती देणारा स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक आहे. रुग्णालयात सशुल्क उपचार घेतलेल्या अन्य रुग्णांच्या एकूण बिलातील दोन टक्के रक्कम गरिबांच्या उपचारांसाठी राखीव ठेवावी, असेही निर्देश आहेत.

रुग्णालयांची चलाखी

  • वर्षभरात रुग्णालयात रुग्णांकडून जमा होणाऱ्या एकूण बिलांपैकी दोन टक्के रक्कम धर्मादाय योजनेतून उपचारासाठी राखून ठेवावी लागते. सर्रास रुग्णालये रोखीने बिले घेतात. सर्वच बिले कागदोपत्री दाखवली जात नाहीत. साहजिकच धर्मादायमधून उपचारही कमी होतात.
  • मिरजेतील कोट्यवधींची उलाढाल असलेल्या एका रुग्णालयाने दोन वर्षांत फक्त सहा रुग्णांना सवलतीत किंवा मोफत उपचार दिले आहेत. विविध शासकीय योजनांचा फायदा उठविण्यासाठी चर्चेत असणाऱ्या सांगलीतील एका रुग्णालयाने ११ रुग्णांवर उपचार केले आहेत. 
  • प्रसूतीसाठी ख्यातनाम असलेल्या मिरजेतील रुग्णालयाने दोन वर्षांत फक्त २९ रुग्णांवर धर्मादायमधून उपचार केले आहेत. भारती, लायन्स नॅब नेत्रचिकित्सा, गुलाबराव पाटील, विजयसिंहराजे पटवर्धन नेत्रचिकित्सा, विवेकानंद (बामणोली) ही रुग्णालये धर्मादायमधून आरोग्यसेवेत आघाडीवर आहेत.


धर्मादायमधून पावणेपाच कोटींचे उपचार

२०२३ व २०२४ या दोन वर्षांत जिल्ह्यातील २९ धर्मादाय रुग्णालयांनी ४ कोटी ३७ लाख ७५ हजार ३९२ रुपये निधी गरिबांसाठी बाजूला काढला. प्रत्यक्षात ४ कोटी ७५ लाख ५७ हजार ४७६ रुपये प्रत्यक्ष खर्च केले. म्हणजे जमा निधीपेक्षा ३७ लाख ८२ हजार ८४ रुपये जास्त खर्च केले. या कालावधीत एकूण ६८०० रुग्णांवर मोफत किंवा सवलतीत उपचार केले.

Web Title: Information about services is not provided in charitable hospitals in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.