गोगलगार्इंचा ४०० हेक्टरवर प्रादुर्भाव
By Admin | Updated: July 7, 2016 00:19 IST2016-07-07T00:04:46+5:302016-07-07T00:19:44+5:30
मिरज पूर्व भागातील स्थिती : उपाययोजनेसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

गोगलगार्इंचा ४०० हेक्टरवर प्रादुर्भाव
संजय माने ल्ल टाकळी
मिरज पूर्व भागातील सुमारे १५ गावांतील ४०० हेक्टरवर शंखी गोगलगार्इंचा प्रादुर्भाव झाला आहे. गोगलगार्इंच्या उपद्रवाने होणाऱ्या पीक नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कृषी विभागाने गोगलगाय निर्मूलनासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
मिरज पूर्व भागात पावसामुळे पिके जोमात आहेत. मात्र दलदलीने गोगलगार्इंचे प्रमाण वाढले आहे. टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी, एरंडोली, मालगावसह पूर्व भागामध्ये द्राक्ष, दोडका, कारली, वांगी, ढबू, फ्लॉवर, भुईमुगाच्या शेंगा, मिरची या पिकांचे गोगलगार्इंकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांचे कोवळे कोंब व सालीसह फळे फस्त केली जात असल्याने संपूर्ण झाड वाळत आहे. द्राक्ष उत्पादकांनाही गोगलगार्इंमुळे फटका बसत आहे. पाच ते सहा फूट उंच असणाऱ्या द्राक्षवेलीवर गोगलगार्इंचा वावर आहे. औषधांचाही या गोगलगार्इंवर परिणाम होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
ओढ्या-नाल्यांच्या परिसरात गोगलगार्इंची संख्या मोठी आहे. गोगलगार्इंवर औषधांची फवारणी केल्यास त्या थोडा वेळ शंखामध्ये लपून बसतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. घरगुती उपाय म्हणून शेतकरी तंबाखूच्या भुकटीचा वापर करीत आहेत. हा उपायही तात्पुरता ठरत आहे. दुसऱ्यादिवशी पुन्हा हजारोंच्या संख्येने गोगलगाई शेतात वावरताना दिसतात. शेतकऱ्यांनी गोगलगाई वेचून पुरून टाकण्याचाही प्रयत्न केला, मात्र तोही अयशस्वी ठरू लागल्याने शेतातील गोगलगार्इंचा बंदोबस्त करायचा कसा?, या चिंतेत शेतकरी आहेत.
बंदोबस्तासाठी उपाययोजना सुरू
मिरज पूर्व भागातील ४०० हेक्टरवरील तूर, मूग, उडीद, झेंडू, भुईमुगाच्या शेंगा या पिकांवर गोगलगार्इंचा प्रादुर्भाव झाला आहे. गोगलगाय निर्मूलनासाठी एक किलो पोहे अथवा चिरमुऱ्यामध्ये पाव किलो गुळाचे पाणी व ५० ते १०० मि.लि क्लोरोपायरी फस्ट या कीटनाशकाचे मिश्रण तयार करुन गोगलगार्इंचा प्रादुर्भाव वाढलेल्या ठिकाणी सायंकाळच्यावेळी वापर केल्यास गोगलगाय निर्मूलनासाठी मदत होणार असल्याची माहिती मंडल कृषी अधिकारी नंदकुमार मेंढे यांनी दिली.
गोगलगार्इंच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात, यासाठी शुक्रवार, दि. ८ रोजी एरंडोली विठ्ठल मंदिर येथे कृषी सप्ताहानिमित्त कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे डॉ. पांडुरंग मोहिते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.