भाजपकडून कार्यकर्ते पोसण्याचा उद्योग

By Admin | Updated: May 18, 2016 00:07 IST2016-05-17T23:57:37+5:302016-05-18T00:07:50+5:30

रघुनाथदादा पाटील : शेतकऱ्यांच्याप्रश्नी २७ रोजी पुण्यात मोर्चा

Industry to feed BJP workers | भाजपकडून कार्यकर्ते पोसण्याचा उद्योग

भाजपकडून कार्यकर्ते पोसण्याचा उद्योग

सांगली : शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. सत्तेबाहेर असताना थेट शेतकऱ्यांना चारा देण्याची घोषणा करणारे हे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर कार्यकर्त्यांना पोसण्याचे निर्णय घेत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. दुष्काळाच्या प्रश्नासह गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा, यांसह अन्य मागण्यांसाठी दि. २७ मे रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादनावर ५० टक्के नफा देण्याची घोषणा करीत होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पशुधन जगविण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत चारा पोहोच करण्याचे आश्वासन देत होते. याच नेत्यांना सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणे तर लांबच, पण, सध्या प्रत्येक कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात केले जात आहेत. उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा शेतकऱ्यांना देण्याची नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी कधी करणार आहात, याचाही आंदोलनात जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनात मराठा सेवा संघ, छावा संघटना, राष्ट्रीय छावा संघटना, मराठा महासंघ, पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, कुरैश जमाअत, आम आदमी पार्टी, देश बचाओ आघाडीसह इतर संघटना सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या...
गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा
वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा
दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा
उत्पादन खर्चावर आधारित किमती न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून, त्यांना कर्जमुक्त करा
बैलगाडी शर्यत बंदी उठवा
सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा
शासनाने नाफेडमार्फत त्वरित कांदा खरेदी सुरु करावी

Web Title: Industry to feed BJP workers