व्यापारी एकजुटीची चेष्टा न करता मनोधैर्य वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:44+5:302021-07-07T04:32:44+5:30
सांगली : कोल्हापूर येथील व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे सोमवारी दुकाने सुरू झाली. हा धागा पकडत सोशल मीडियातून, सांगलीतील व्यापाऱ्यांत एकजूट नसल्याचा ...

व्यापारी एकजुटीची चेष्टा न करता मनोधैर्य वाढवा
सांगली : कोल्हापूर येथील व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे सोमवारी दुकाने सुरू झाली. हा धागा पकडत सोशल मीडियातून, सांगलीतील व्यापाऱ्यांत एकजूट नसल्याचा आरोप करीत एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली होती. व्यापाऱ्यांच्या एकजुटीची चेष्टा न करता त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आर्जव व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केले.
कोल्हापूर शहरातील दुकाने सुरू झाल्याचे वृत्त येताच सांगलीतील व्यापारी संघटनांच्या एकजुटीवर सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह उभे केले गेले. या वादात शहरातील आमदारांना खेचण्यात आले. कोल्हापूरचे मंत्री, आमदारांनी करून दाखविले, मग सांगलीचे मंत्री, आमदार कुठे आहेत, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला.
त्यावर अध्यक्ष शहा म्हणाले की, कोल्हापूर शहरातील पाॅझिटिव्हिटी दर १० टक्क्यापेक्षा कमी असल्याने पाच दिवस दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यावरून सांगलीतील काहीजणांनी संघटना, लोकप्रतिनिधींच्या क्षमतेवर प्रश्न केले. नेमके त्यांना टीका करायची आहे, की खच्चीकरण, हे समजले नाही. कोल्हापुरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच दुकाने उघडत आहेत. सांगलीत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा १० दिवस व्यापार सुरू करण्याची मुभा प्रशासनाने दिली होती. केवळ शहरच नव्हे, तर जिल्ह्यातील निर्बंध हटविले होते. ते करताना जनतेला रस्त्यावर उतरावे लागले नाही. शहरात व्यापाऱ्यांच्या अनेक संघटना आहेत. आमच्यात मतभिन्नता असली तरी, सर्वजण व्यापारी वर्गाच्या हिताचाच विचार करतात. सांगलीचाही पाॅझिटिव्हिटी दर नियंत्रणात येत आहे. येत्या सोमवारपासून दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास आम्हीही रस्त्यावर उतरू. पण लोकांच्या आरोग्याशी खेळ आम्हाला मान्य नाही. व्यापारी एकजुटीची चेष्टा न करता त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.