पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने १० हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:15+5:302021-07-27T04:28:15+5:30

सांगली : पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रतिकुटुंब दहा हजार रुपये रोख व धान्य स्वरूपात पाच हजार रुपयांची मदत राज्याच्या ...

Immediate relief of Rs 10,000 to flood affected families | पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने १० हजारांची मदत

पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने १० हजारांची मदत

सांगली : पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रतिकुटुंब दहा हजार रुपये रोख व धान्य स्वरूपात पाच हजार रुपयांची मदत राज्याच्या सर्व पूर व आपत्तीग्रस्त भागात दिली जाईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. पुरामध्ये जी घरे गेली किंवा घरात पुराचे पाणी शिरले आहे, त्या सर्व कुटुंबांना दहा हजार रुपये रोख स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पूर्णपणे घर पडले असेल तर त्यालादेखील मदत दिली जाणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये आपत्ती निवारण फंडातून देेण्यात येणार आहेत.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या नुकसानीचा आढावा पंचनाम्याद्वारे एकत्रित करून मदत करण्यात येईल.

राज्यात मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पावासाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. पूरस्थितीत योग्य नियोजनामुळे कुठेही जीवितहानी झालेली नाही.

चौकट

बॅकवॉटरचा फटका नाही

वडेट्टीवार म्हणाले की, अलमट्टी व महाराष्ट्रातील धरणांच्या व्यवस्थापनात योग्य समन्वय राखला गेल्याने बॅकवॉटर किंवा फुगवट्याचा कोणताही प्रश्न उद्‌भवला नाही. योग्य नियोजनाचे हे यश म्हणावे लागेल.

चौकट

पूरसंरक्षक भिंतीबाबतही प्रयत्न

राज्यातील पूरग्रस्त गावांमध्ये शक्य त्या ठिकाणी पूरसंरक्षक भिंती उभारण्यासह अन्य उपाययोजनांबाबत प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Immediate relief of Rs 10,000 to flood affected families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.