रेल्वे यार्डातून अवैध पेट्रोलचा साठा जप्त
By Admin | Updated: September 23, 2014 00:11 IST2014-09-22T23:08:33+5:302014-09-23T00:11:39+5:30
मिरजेत कारवाई : तेल चोरीचे प्रकार वाढले

रेल्वे यार्डातून अवैध पेट्रोलचा साठा जप्त
मिरज : मिरजेत रेल्वे यार्डात अवैध पेट्रोलचा सुमारे दोनशे लिटर चोरटा साठा आॅईल डेपोच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. मिरजेतील इंधन डेपोतून पेट्रोल, डिझेल चोरीचे प्रकार सुरूच असून, रेल्वे टँकरमधून होणाऱ्या इंधन चोऱ्या रोखण्यात सुरक्षा यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही.
मिरजेत रेल्वेस्थानकालगत असलेल्या इंधन डेपोतून व रेल्वे टँकरमधून पेट्रोल व डिझेल चोरणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. इंधनचोर टोळ्या इंधन डेपो परिसरात इंधनाचा अवैध साठा करून ठेवत असल्याने डेपोच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. रेल्वे टँकरमधून इंधन चोरीबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल व आॅईल डेपोच्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली आहे.
मिरज रेल्वे यार्डातील एका छोट्या खोलीत टँकरमधून चोरलेल्या सुमारे दोनशे लिटर पेट्रोलचा साठा डेपो अधिकाऱ्यांना सापडला. टँकरमधून चोऱ्या रोखण्यासाठी गस्त व तपासणी सुरू असल्याने चोरट्यांनी इंधनसाठा करण्यासाठी प्लॅस्टिक कॅनऐवजी जाड प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर सुरू केला आहे. मोठ्या कॅरीबॅगमध्ये करण्यात आलेला पेट्रोल साठा जप्त करण्यात आला.
रेल्वे हद्दीत सापडलेल्या पेट्रोल साठ्याबाबत चौकशी सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक गोकुळ सोनोनी यांच्याशी
संपर्क साधला असता, ख्वाजा, अस्लम, विजय, सुभाष जोसेफ
या संशयित चोरट्यांची नावे
समजली असून, त्यांना व इंधन उतरविण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला चौकशीसाठी पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
सुरक्षा यंत्रणा अपयशी
मिरजेत रेल्वेस्थानकालगत असलेल्या इंधन डेपोतून व रेल्वे टँकरमधून पेट्रोल व डिझेल चोरणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. इंधनचोर टोळ्या इंधन डेपो परिसरात इंधनाचा अवैध साठा करून ठेवत असल्याने डेपोच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. चोरी रोखण्यात सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली आहे.