प्रदूषण कराल तर कारवाई अटळ : लिंबाजी भड
By Admin | Updated: December 15, 2015 23:23 IST2015-12-15T22:50:24+5:302015-12-15T23:23:22+5:30
नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करणार, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगितले

प्रदूषण कराल तर कारवाई अटळ : लिंबाजी भड
सांगली जिल्ह्यात हवा व पाणी प्रदूषणाची स्थिती फारशी गंभीर नाही. काही घटना वगळता प्रदूषणाचे प्रमाण आजही कमी आहे. औद्योगिक क्षेत्रात धुलीकणांचे प्रमाण थोडे वाढले आहे. पण त्याबाबत प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रदूषणाबाबत मंडळ नेहमीच दक्ष असून, कोणाचीही गय केली जात नाही. शहरात तीन ठिकाणी हवा प्रदूषणाचे मोजमाप केंद्र आहे. तसेच पाण्याचे नमुने वरचे वर घेऊन तपासले जातात. प्रदूषण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावरच आमचा भर असतो, नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करणार, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत भड यांच्याशी साधलेला संवाद...
४प्रश्न : आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात काम केले?
- प्रदूषण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी म्हणून सांगलीतून सुरूवात झाली. १९९८ मध्ये सांगलीत शासकीय सेवेत रुजू झालो. इथे तीन वर्षे काम केले. त्यानंतर औरंगाबाद, लातूर, सोलापूर, नांदेड, भंडारा या जिल्ह्यांत काम केले. प्रदूषण रोखण्याबरोबरच नागरिकांत जनजागृतीला प्राधान्य दिले आहे. नागरिक व शासन यंत्रणांनी एकत्र येऊन प्रदूषणाला आळा घालण्याची गरज आहे. शासकीय यंत्रणा आपापल्यापरीने कार्यवाही करीत असते. पण त्याला नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
४प्रश्न : सांगलीतील प्रदूषणाची स्थिती काय आहे?
- सांगलीतील हवा, पाणी प्रदूषणाची स्थिती फारशी गंभीर नाही. हवा प्रदूषणाबाबत म्हणाल तर, शहरात वालचंद कॉलेज, कुपवाड एमआयडीसी व राजवाडा चौक या तीन ठिकाणी हवेच्या प्रदूषणाचे मोजमाप करणारी यंत्रणा कार्यरत आहे. शहरात धुलीकणांचे प्रमाण आढळून येते. हे प्रमाण औद्योगिक क्षेत्रात अधिक असते. रहिवासी व गावठाण भागात धुलीकणांचे प्रमाण कमी आहे. सल्फरडाय आॅक्साईडचे प्रमाणही कमी आहे. औद्योगिक वसाहतीत धुलीकणांचे प्रमाण अंशत: वाढले आहे. शहरात रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी धुलीकण दिसून येतात. तीन मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे धुलीकण असल्याने ते डोळ्याला दिसत नाहीत. ते श्वसनाद्वारे शरीरात जातात. त्यातून श्वसनाचे विकार होतात. पाणी प्रदूषणाबाबत कृष्णा नदीवर बहे, बोरगाव, माईघाट येथे, तर वारणा नदीवर समडोळी व मांगले येथे वरचे वर पाण्याचे नमुने घेतले जातात. त्यांची तपासणी होते. कुठे दूषित पाणी आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाते.
४कृष्णा नदीत सांडपाणी मिसळते, त्यावर नियंत्रण कसे आणता?
महापालिका हद्दीतील सांडपाणी नाल्याद्वारे नदीपात्रात जाते. साखर कारखाने व इतर उद्योगधंद्यांतून बाहेर येणारे दूषित पाणी नदीत मिसळून पाणी प्रदूषित होत असते. त्यासाठी आम्ही दक्ष असतो. बरेच साखर कारखाने, उद्योजकांना नोटिसा बजाविल्या आहेत. महापालिकेने शेरीनाला योजना हाती घेतली असून, सध्या सांडपाणी धुळगावला उचलले जात आहे. हरिपूर नाला व गावभागातील नाल्यांचे पाणी आॅक्सिडेशन पाँडकडे वळविले जाणार आहे. महापालिकेने शंभर दशलक्ष लिटर क्षमतेच्या आॅक्सिडेशन पाँडचे काम हाती घेतले आहे. मध्यंतरी नदी प्रदूषणाबद्दल महापालिकेला दंडही केला आहे. शिवाय न्यायालयात खटलाही दाखल आहे.
४प्रश्न - पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?
उत्तर - औद्योगिक वसाहतील उद्योगधंद्यांना आम्ही भेटी देऊन पाहणी करतो. उद्योजकांकडून सांडपाणी विनाप्रक्रिया बाहेर सोडले असेल तर, जलप्रदूषण नियंत्रण कायदा १९७४, कलम ३३ अ नुसार कायदेशीर कारवाई करतो. त्यासाठी त्यांना नोटिसा दिल्या जातात. त्यातून सुधारणा न झाल्यास उद्योग बंद करण्याची शिफारस प्रादेशिक कार्यालयाकडे करतो. जिल्ह्यातील १० ते १५ कारखाने बंदची शिफारस केली आहे. आम्ही तक्रारींची वाट न पाहता कारवाई केली जाते. हवा प्रदूषणाबाबतही कडक कायदे आहेत. हवा प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१, कलम ३१ (अ) नुसार कारवाई सुरू असते.
४प्रश्न : नदीत मासे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे कारण काय?
उत्तर : नदीपात्रात स्पेंटवॉशचे पाणी मिसळल्याने मासे मृत होण्याच्या घटना घडत आहेत. स्पेंटवॉशमुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम माशांवर होतो. अशा घटना घडल्यानंतर प्रदूषण मंडळाकडून तातडीने संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.
४शीतल पाटील ४
‘वसंतदादा’ला नोटीस
वसंतदादा कारखाना सर्वात जुना आहे. कारखान्याची जलप्रदूषण यंत्रणा चांगली आहे. हवा प्रदूषणाची यंत्रणा खराब आहे. ती दुरुस्त करण्यासाठी ताकीदवजा पत्र दिले आहे. दुरुस्तीचे आश्वासन दिले आहे. वसंतदादा कारखान्याने प्रदूषण मंडळाकडे खुलासा केला आहे. त्याची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यातील इतर कारखान्यांवर नदी प्रदूषणाबाबत नोटिसा दिल्या आहेत. त्यांनी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा दुरुस्त करून घेतली आहे, असेही भड म्हणाले.