नोकऱ्या टिकवायच्या असतील, तर यंदाही उन्हाळी सुटी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 10:53 AM2022-05-02T10:53:12+5:302022-05-02T10:53:43+5:30

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फक्त सहा दिवसच रजा, दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही मिळणार नाही पुरेशी सुटी.

If jobs are to be maintained there is no summer vacation this year sangali anganwadi | नोकऱ्या टिकवायच्या असतील, तर यंदाही उन्हाळी सुटी नाही

नोकऱ्या टिकवायच्या असतील, तर यंदाही उन्हाळी सुटी नाही

Next

सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यावर्षीही उन्हाळी सुटी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल सुटीसंदर्भातील आदेश शुक्रवारी जारी केले. त्यानुसार सेविका व मदतनीसांना प्रत्येकी फक्त सहा दिवसांची सुटी मंजूर केली आहे.

कोरोना काळात दोन वर्षे कर्मचाऱ्यांना सुटी मिळाली नव्हती. यावर्षी नियमित सुटीमध्ये दोन वर्षांतील बुडालेल्या सुट्यांचाही समावेश करून किमान १५-२० दिवसांच्या सुटीची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती; पण शासनाने फक्त सहा दिवसच सुटी दिली आहे.

पत्रात म्हटले आहे की, कोरोना काळात अंगणवाड्या बंद होत्या. कोरोनानंतर नुकत्याच पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. या स्थितीत लगेच सुट्या देणे संयुक्तिक होणार नाही. मदतनीसांना २ ते ८ मेदरम्यान आणि सेविकांना ९ ते १५ मेदरम्यान सुटी घेता येईल. मुलांना वर्षभरात किमान ३०० दिवस आहार वाटप गरजेचा असल्याने सुटी घेता येणार नाही. या निर्णयाने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. कोरोनाकाळात अंगणवाड्या बंद असल्या तरी कामे सुरूच होती. कोरडा शिधावाटप, मुलांचे वजन घेणे व अन्य आरोग्यविषयक कामे सुरू होती. ती बेदखल करीत यावर्षी सुटीवर गंडांतर आणले आहे.

सुटी टाळा, नोकऱ्या टिकवा
मुले खासगी शाळांत जाऊ नयेत, सरकारी अंगणवाडीतच यायला हवीत, असा प्रशासनाचा दृष्टिकोन आहे. अंगणवाड्या बंद राहिल्या, तर मुले खासगीमध्ये प्रवेश घेण्याची भीती आहे. त्यामुळे अंगणवाड्या सुरूच ठेवा, प्रवेश वाढवा आणि नोकऱ्या टिकवा, असे अप्रत्यक्ष फर्मान शासनाने जारी केले आहे.

उन्हाळ्यात पालक परगावी जात असल्याने अंगणवाडीत पुरेशी उपस्थिती नसते. गेली दोन वर्षे कर्मचाऱ्यांनी कोरोना साथीविरोधात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. याची दखल घेऊन यावर्षी किमान १५ दिवसांची सुटी आवश्यक आहे; पण प्रशासनाने मनमानी निर्णय घेतला आहे.
- रेखा पाटील, जिल्हाध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी महासभा

Web Title: If jobs are to be maintained there is no summer vacation this year sangali anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली