अस्वच्छता दिसल्यास खाते प्रमुखांवर कारवाई करणार
By Admin | Updated: November 18, 2014 23:27 IST2014-11-18T22:21:14+5:302014-11-18T23:27:47+5:30
अंजली मरोड : दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच

अस्वच्छता दिसल्यास खाते प्रमुखांवर कारवाई करणार
विटा : स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून, १४ सरकारी विभागांची कार्यालये असलेल्या येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आता अस्वच्छता दिसल्यास थेट खातेप्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून स्वच्छतेबाबत सक्त सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, पान, तंबाखू व गुटखा खाऊन प्रशासकीय इमारतीचे कोपरे रंगविणाऱ्या नागरिकांवर आता इमारतीत बसविण्यात आलेल्या दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे.
संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून विटा येथील टोलेजंग मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या इमारतीत १४ शासकीय विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिकांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. या इमारतीचे सर्वच कोपरे पान, तंबाखू, गुटखा, मावा खाणाऱ्या नागरिकांनी रंगवून टाकले होते. त्यामुळे इमारतीत अत्यंत दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते.
या पार्श्वभूमीवर विट्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी अंजली मरोड, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत महाजन, महादेव पाटील यांच्यासह तहसील, कृषी, सामाजिक वनीकरण, वजन-मापे, उपविभागीय कृषी, सहायक निबंधक, दुय्यम निबंधक, उत्पादन शुल्क या विविध विभागांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी कार्यालयाच्या आवारातील कचरा बाहेर काढून नागरिकांनी पान, तंबाखू खाऊन रंगविलेल्या भिंतींचे कोपरे स्वच्छ करण्यात आले.
दरम्यान, आता यापुढील काळात इमारतीतील आवारात कचरा व अस्वच्छता दिसल्यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार मरोड यांनी सांगितले. (वार्ताहर)
नागरिकांवर दंडात्मक कारवाई
इमारतीत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी इमारतीच्या आवारात दहा सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रशासकीय कार्यालयात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आता चकाचक दिसू लागली आहे.
इमारतीचे सर्वच कोपरे पान, तंबाखू, गुटखा, मावा खाणाऱ्या नागरिकांनी रंगवून टाकले होते. ते कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केले.