आबांच्या विजयाची जबाबदारी माझी

By Admin | Updated: August 22, 2014 23:18 IST2014-08-22T23:07:42+5:302014-08-22T23:18:31+5:30

जयंत पाटील : वाळवा पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

I have the responsibility of winning the best | आबांच्या विजयाची जबाबदारी माझी

आबांच्या विजयाची जबाबदारी माझी

इस्लामपूर : राजकारणात नेता एका दिवसात जन्माला येत नाही. मी आणि आर. आर. आबा १९९० पासून बरोबर आहोत. ज्या तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दगड हलत नव्हता, तेथे आबांनी विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या निवडणुकीच्या राजकारणाचा काळ आहे. आबांच्या मतदारसंघावर अनेकांचा डोळा आहे. मी माझी तयारी केली असल्याने, माझा पूर्ण वेळ आबांना देऊन त्यांना विजयी करण्याची जबाबदारी घेत आहे, असे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केले.
निमित्त होते वाळवा पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या उद्घाटनाचे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याहस्ते उद्घाटन झाले.
जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या राजकारणाचा, उमेदवारी ठरवण्याचा काळ असताना, आर. आर. पाटील त्यातूनही वेळ काढून आले आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. लोकसभेला जे घडले तेच विधानसभेला होईल, असा काहींचा समज झाल्याने ते लाटेत वाहत चालले आहेत. मात्र प्रत्येक निवडणुकीसाठी डोळसपणे विचार करणारा मतदार महाराष्ट्रात आहे. १५ वर्षांच्या सत्ताकाळात बरेच पुढारी सावलीला आले. आता उन्हाचा काळ आल्याने ते बाहेर पडत आहेत. मर्यादा होत्या तोपर्यंत या बाहेर पडणाऱ्यांचे ऐकले. या सर्वांना आबांनी ठणकावून सांगितले आहे की, ज्यांना जायचे त्यांना जा. आम्ही रेडिमेड पुढारी घ्यायची चुकीची पध्दत अवलंबली, ती आमची चूकच होती. आबा व माझ्यात कधीच मतभेद नव्हते. काम आणि कार्यकर्त्यांच्या वर्दळीतून आम्ही कमी वेळा एकत्र येतो. त्यामुळे मतभेद असल्याच्या वावड्या होत्या. युतीच्या राज्यकर्त्यांनी अंदाजपत्रक न बघताच केवळ नारळ फोडले. मात्र आता टेंभूचे पाणी आटपाडी, सांगोल्यापर्यंत गेले आहे.
गृहमंत्री पाटील म्हणाले की, माझ्या विजयाची जबाबदारी जयंतरावांनी घेतल्याने आजचा दिवस माझ्यादृष्टीने सुदिन असून, मी पक्षाच्या प्रचारासाठी राज्यभरात फिरणार आहे. डबल ढोलकी वाजविणारे पुढारी पक्षात घेतल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. यापुढे कार्यकर्ते तयार करून नवीन पिढी घडवू. येत्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विधानसभा आणि लोकसभेलाही महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची भूमिका घेत राष्ट्रवादी एक पाऊल पुढे टाकणार आहे.
सभापती रावींद्र बर्डे यांनी प्रास्ताविक, प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. पक्षप्रतोद जयकरराव नांगरे-पाटील यांनी आभार मानले. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, दिलीपराव पाटील, विलासराव शिंदे, विष्णुपंत शिंदे, बी. के. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील, जनार्दनकाका पाटील, सभापती आनंदराव पाटील, सौ. भाग्यश्री शिंदे, नेताजीराव पाटील, बाबासाहेब मुळीक, उदयसिंह नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: I have the responsibility of winning the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.