महापालिकेत येण्याचे निमंत्रण मिळालेय, वेळ मिळाला की जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:11+5:302020-12-11T04:53:11+5:30

सांगली : महापालिकेत सत्तांतराचा कोणताही प्रश्न नसून, जनतेने ‘त्यांच्या’ हाती सत्ता दिली आहे. सत्तांतराविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही अथवा ...

I have received an invitation to come to the Municipal Corporation, if I have time, I will go! | महापालिकेत येण्याचे निमंत्रण मिळालेय, वेळ मिळाला की जाणार!

महापालिकेत येण्याचे निमंत्रण मिळालेय, वेळ मिळाला की जाणार!

सांगली : महापालिकेत सत्तांतराचा कोणताही प्रश्न नसून, जनतेने ‘त्यांच्या’ हाती सत्ता दिली आहे. सत्तांतराविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही अथवा कोणी संपर्कातही नाही. त्यामुळे ‘त्यांना’ कार्यकाल पूर्ण करू द्या. महापालिकेत येण्याविषयीचे ‘निमंत्रण’ मला मिळाले आहे, ‘वेळ’ मिळाला की, लवकरच मी महापालिकेतही जाणार आहे, असा सूचक इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दिला.

आढावा बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पदवीधर निवडणुकीवेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवक पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. शिवाय सात नगरसेवकही त्यांना भेटल्याची चर्चा होती. त्याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, महापौर पदाचा कार्यकाल फेब्रुवारीत पूर्ण होणार असल्याने सध्या सत्तांतराची चर्चा सुरू आहे. मात्र, महापालिकेत सत्तांतर करण्यात कोणताही रस नाही. उलट जनतेने त्यांना निवडून दिले आहे, तर त्यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण करावा. सत्तांतराविषयी मला कोणीही भेटलेले नाही.

राजकीय कारणासाठी कोणी भेटले नसले तरी, आढावा घेण्यासाठी महापालिकेत येण्यासाठी मला निमंत्रण मिळाले आहे. विधानपरिषद निवडणूक व आता होणारे विधिमंडळ अधिवेशन अशा व्यस्त कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर लवकरच महापालिकेत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चौकट

जनतेचा कौल मान्य

महापालिका निवडणुकीत जनतेने त्यांना संधी दिल्याने जनतेच्या मताचा अनादर करून सत्तांतर योग्य नाही. याशिवाय महापालिकेच्या वर्तुळातील कोणीही मला भेटलेले नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत असे सत्तांतर होणार नाही आणि त्यात रसही नसल्याने त्यांनी आपला कार्यकाल पूर्ण करावा, त्यानंतर बघू, असेही पाटील म्हणाले.

Web Title: I have received an invitation to come to the Municipal Corporation, if I have time, I will go!