सांगली : लाडक्या ‘बब्या’ श्वानाच्या मदतीने त्याने ससा, कोल्हा, घाेरपडीची शिकार केली. शिकारीचे फोटो आणि व्हिडीओ ‘बब्या किंग ३०२’ आणि ‘दुधेभावीकरांचा बब्या’ नावाने ‘इन्स्टा’वर अपलोड केले. शिकाऱ्याने शिकार केल्याचा सहजच पुरावा मिळताच वन विभागाने संशयित उमाजी जगन्नाथ मलमे (रा. दुधेभावी, ता. कवठेमहांकाळ) याला जाळ्यात पकडले.इंस्टाग्रामवर ‘बब्या किंग ३०२’ आणि ‘दुधेभावीकरांचा बब्या’ यावर उमाजी मलमे याने केलेल्या वन्यप्राण्यांच्या शिकारीचे फोटो व व्हिडीओ अपलोड केलेले होते. याबाबतची वन विभागाला गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी ‘इन्स्टा’ वर जाऊन खात्री केली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने मौजे दुधेभावी परिसरात जाऊन चौकशी केली, तेव्हा उमाजी मलमे हा तेथील रहिवासी असून, त्याला शिकारीचा छंद असल्याचे समजले. दि. १८ रोजी मौजे दुधेभावी येथे उमाजी मलमे याची चौकशी केल्यानंतर घरातून त्याला ताब्यात घेतले. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेले फोटो व व्हिडीओ दाखवले. त्याने फोटो व व्हिडीओ त्याचेच असल्याचे कबूल केले.मलमे याने दुधेभावी गावच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ससा, कोल्हा, घोरपड या वन्यप्राण्यांची स्वत:च्या मालकीच्या ‘बब्या’ नावाच्या पाळीव कुत्र्याच्या मदतीने शिकार केली असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी उमाजी मलमे याच्यावर गुन्हा नोंद केला.
उमाजी अन् बब्या सोशल मिडियावर झळकलेउमाजी याने बब्या श्वानाच्या मदतीने वन्य प्राण्यांची शिकार करून ‘इन्स्टा’ फोटो, व्हिडीओ टाकल्यानंतर काहींनी त्याला ‘लाइक’ केले; परंतु, हे करताना त्याने स्वत:विरुद्धच पुरावाच सादर केला. त्यामुळे उमाजी जाळ्यात सापडला. त्याच्यासह बब्यादेखील कारवाईवेळी वन विभागाच्या पथकाबरोबर चांगलाच झळकला आहे. त्याची चर्चा रंगली आहे.