मार्केट यार्डमध्ये हमालांचा संप
By Admin | Updated: January 3, 2015 00:13 IST2015-01-02T23:18:55+5:302015-01-03T00:13:27+5:30
दहा कोटींची उलाढाल ठप्प : तीस टक्के दरवाढीची मागणी

मार्केट यार्डमध्ये हमालांचा संप
सांगली : तीस टक्के हमाली वाढीच्या मागणीवरुन हमाल कामगारांनी बुधवारी सायंकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारीही आंदोलनच सुरु होते. यामुळे रोजची आठ ते दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. हमाल कामगार मागण्यावर ठाम आहेत. व्यापाऱ्यांकडून हमालांच्या मागणीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्यामुळे आंदोलन चालूच आहे. दरम्यान, हमाल संघटनांनी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला आहे.
हमाल दरवाढीचा प्रत्येक दोन वर्षानी नवा करार होतो. जुन्या कराराची मुदत ३१ डिसेंबर २०१४ रोजी संपली. नवा करार करताना हमालीच्या दरात तीस टक्के वाढ करण्यात यावी, अशी मागणी हमाल पंचायतीने केली आहे. या प्रमुख मागणीसाठी हमालांनी तीन दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाकडे व्यापारी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा हमालांनी इशारा दिला आहे.
व्यापाऱ्यांनी मात्र ९ टक्के हमाली वाढीला मंजुरी दिली आहे. यावरुन बोलणी फिसकटल्याने बुधवारी सायंकाळपासून हमाल पंचायतीने काम बंद आंदोलन सुरु केले. अचानक काम बंद झाल्याने मालाची चढ-उतार थांबली. आजची सुमारे आठ ते दहा लाखांची उलाढाल ठप्प झाली.
आंदोलनाबाबत हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम म्हणाले की, हमालांची संपाची इच्छा नव्हती. मात्र व्यापाऱ्यांनी ९ टक्क्याच्या वर हमाली देण्यास नकार दिला. चर्चेसाठीही वेळ दिली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीने बोलाविलेल्या बैठकीलाही व्यापारी प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने आम्हाला संपाशिवाय पर्याय राहिला नाही. आता व्यापाऱ्यांच्या भूमिकेवरच संपाची माघार अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)
चर्चा सुरु असताना संप : सारडा
व्यापाऱ्यांनी हमालांच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा सुरु केली होती. कोणत्याही परिस्थितीत संप करायचा नाही असे ठरले असतानाही हमालांनी संप केला आहे, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली. आम्ही ९ टक्के हमाली वाढीस होकार दिला आहे. सध्याच्या मंदीच्या काळात व संपूर्ण राज्यात ही सर्वाधिक हमाली आहे. असे असतानाही हजारो पोती हळद व लाखो रवे गूळ मार्केट यार्डमध्ये पडून आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.