निधी अडविणारे तारणहार कसे?
By Admin | Updated: July 31, 2014 00:19 IST2014-07-31T00:16:24+5:302014-07-31T00:19:22+5:30
आर. आर. पाटील : उपळावीत टीका

निधी अडविणारे तारणहार कसे?
तासगाव : कृष्णा खोरे महामंडळाची कामे अनुशेषाचे निमित्त करीत ज्यांनी अडविली. आता तेच तारणहार कसे होणार? असा सवाल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उपळावीत बोलताना केला.
ताकारी उपसा सिंचन योजनेच्या १३१ ते १४४ कि.मी.मधील कालव्याच्या, वितरण व्यवस्थेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डी. के. काका पाटंील, सभापती गोकुळाताई शेंडगे, जि. प. सदस्या योजनाताई शिंदे, कृष्णा खोरेचे मुख्य अभियंता पी. सी. घोलप, शंकरदादा पाटील, नगराध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते.
गृहमंत्री पाटील म्हणाले की, युती सरकारमधल्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनीच त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांवर, ही लुटारूंची टोळी असल्याचा आरोप केला होता. अनुशेषाचे निमित्त करण्यात आले आणि योजना रखडल्या. हक्काचे पाणी मिळाले पाहिजे या उद्देशाने कृष्णा खोरेची स्थापना करण्यात आली आहे. मोदी सरकारने पहिल्या अर्थसंकल्पातून आता सामान्यांच्या माथी महागाई आणली आहे. रेल्वेभाडे, डिझेल, सिमेंट, सळईच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही ते म्हणाले. पाच वर्षात काय काम केले असे विचारणाऱ्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात फिरून यावे, असेही ते म्हणाले.
यावेळी डी. के. काका पाटील, मुख्य अभियंता पी. सी. घोलप, शंकरदादा पाटील आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक शिवाजी जाधव यांनी केले. यावेळी उपळावी, मतकुणकी, मणेराजुरी परिसरातले कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)