देशमुखांच्या राजीनाम्यासाठी किती पुरावे हवेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:25 IST2021-03-21T04:25:16+5:302021-03-21T04:25:16+5:30
सांगली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच गृहमंत्री अनिल देशमुख व राज्य सरकारचा पोलखोल केला आहे. त्यामुळे ...

देशमुखांच्या राजीनाम्यासाठी किती पुरावे हवेत?
सांगली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच गृहमंत्री अनिल देशमुख व राज्य सरकारचा पोलखोल केला आहे. त्यामुळे देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आणखी किती पुरावे हवेत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
पाटील म्हणाले की, आम्ही सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची अगोदरपासून मागणी करीत आहोत. यासाठीचे पुरावेही आम्ही दिले. तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही. आता माजी पोलीस आयुक्तांनीच त्यांचा भांडाफोड केला आहे. त्यामुळे हे सरकार भ्रष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.
सचिन वाझे हा केवळ ‘कलेक्टर’ आहे, त्याच्या मागे सरकारमधील कोणीतरी आहे, हे आम्ही सांगत होतो. अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात आणखी काय बाहेर येते हे माहीत नाही, पण सरकारची राज्यात किती दहशत आहे, हे यावरून दिसून येते. राज्यातील मंत्री बलात्कार व अन्य प्रकरणात अडकत आहेत. जो मोठा गुन्हा राज्यात घडतो त्यात एकतरी मंत्री अडकत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सरकारचे कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण नाही. राज्यातील लोक दहशतीखाली आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांची चूक गृहमंत्रीच मान्य करतात. आता संबंधित अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतर पूर्वी पोपटासारखे बोलणारे मंत्री आता गप्प का आहेत, असा सवालही पाटील यांनी केला.
चौकट
राऊत यांना गृहमंत्री करा
संजय राऊतांना आमचे आरोप नेहमी खोटे वाटतात. सरकारची बाजू घेणाऱ्या संजय राऊत यांनाच आता गृहमंत्री करावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
चौकट
आम्ही त्यांना सोडणार नाही
जळगावमधील फुटीर नगरसेवकांवर कारवाईसाठी प्रयत्न करू. सांगलीच्या फुटीर नगरसेवकांवर कारवाई केली आहे. विभागीय आयुक्तांकडे पत्र दिले आहे. त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, पण आम्ही त्यांना सोडणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.