ऐतिहासिक तटबंदीचे दगड नालाबंडिंगसाठी!

By Admin | Updated: August 26, 2014 22:20 IST2014-08-26T22:11:17+5:302014-08-26T22:20:45+5:30

बाणूरगड येथील प्रकार : प्रशासनासह पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

Historic gutter stones for nawabanding! | ऐतिहासिक तटबंदीचे दगड नालाबंडिंगसाठी!

ऐतिहासिक तटबंदीचे दगड नालाबंडिंगसाठी!

दिलीप मोहिते - विटा --शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणाऱ्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथील ऐतिहासिक शिवकालीन तटबंदी व बुरूजांच्या दगडांचा वापर नालाबंडिंगसाठी सुरू केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बाणूरगड (भूपाळगड) व कोळदुर्ग या दोन किल्ल्यांची मोठी वाताहत झाली असून, येथील शिवकालीन तटबंदी व बुरूजांचे मोठे दगड फोडून या दगडाचे नालाबंडिंग बांधले आहेत. मात्र, प्रशासनाच्या सर्वच विभागांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले असून ‘ते आमचे कामच नाही’, असे सांगून तक्रार करणाऱ्यांनाच हाकलून लावले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रशासन व पुरातत्त्व विभागाने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
खानापूर तालुक्यातील बाणूरगड म्हणजेच भूपाळगड व शुकाचार्य परिसरातील कोळदुर्ग हे दोन किल्ले शिवकालीन आहेत. मात्र, कोळदुर्ग हा किल्ला सध्या नामशेष झाला आहे, तर थोड्या फार इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणाऱ्या बाणूरगड किल्ल्याची हीच अवस्था होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बाणूरगड येथे शिवकालीन तटबंदी व मोठे बुरूज आहेत. शासनाची नालाबंडिंग कामे या परिसरात सुरू आहेत. त्यामुळे ऐतिहासिक तटबंदी व बुरूजांच्या मोठ्या दगडांवर घाव घालून या दगडातून नालाबंडिंगची कामे सुरू केली आहेत. दरम्यान, खानापूर येथील ओंकार तोडकर व खंडोजी तोडकर या गडाच्या अभ्यासकांनी बाणूरगड येथे भेट दिली. त्यावेळी ऐतिहासिक तटबंदी व बुरूजांचे मोठे दगड काढून ते फोडून नालाबंडिंगला वापरल्याचे दिसून आले. त्यामुळे तोडकर यांनी तातडीने प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन हा प्रकार घडत असल्याचे सांगितले.
मात्र, प्रशासनासह पुरातत्त्व विभागाने या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत याबाबत ठोस निर्णय घेतला गेला नसल्याची तक्रार तोडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ऐतिहासिक तटबंदी व बुरूजांची मोठी तोडफोड सुरू असताना पुरातत्त्व विभाग झोपी गेला आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

बाणूरगड येथे ऐतिहासिक भूपालगड शिवकालीन किल्ला आहे. ऐतिहासिक तटबंदी व बुरूज येथील इतिहासाचे आजही साक्षीदार आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी बाणूरगड परिसरात गेलो असता, तेथील चिलखती बुरूजाशेजारी चोर दरवाजाचे अवशेष सापडले. त्याठिकाणी जुन्या अनेक बुजलेल्या व पडलेल्या पाऊलवाटाही निदर्शनास आल्या. त्यानंतर काही दिवसांनी मी पुन्हा त्याठिकाणी गेलो असता तेथे असलेल्या ऐतिहासिक तटबंदी व बुरूजाचे दगड फोडून ते नालाबंडिंग व तालीसाठी वापरले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे मी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली; परंतु त्याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही.
- ओंकार तोडकर,
गडाचे अभ्यासक, खानापूर

पुरातत्त्व विभाग गांधारीच्या भूमिकेत
खानापूर येथील ऐतिहासिक दर्गा जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने काम हाती घेतले आहे. दर्गा परिसरात असलेल्या लोकांच्या इमारतींचे अतिक्रमण झाल्याचे सांगत पुरातत्त्व विभागाने अतिक्रमण केलेल्या लोकांवर पोलिसांत गुन्हे दाखल केले; मात्र बाणूरगड येथे शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा जतन करण्याचा प्रयत्न पुरातत्त्व विभागाकडून होत नसल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शासकीय नालाबंडिंग कामासाठी पुरातन बाणूरगड (भूपालगड) किल्ल्याची तटबंदी व बुरूज उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असताना पुरातत्त्व विभागाने गांधारीची भूमिका का घेतली आहे? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

Web Title: Historic gutter stones for nawabanding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.