मिरजेला हॅलो, सांगलीला टाटा
By Admin | Updated: September 14, 2014 00:12 IST2014-09-14T00:11:57+5:302014-09-14T00:12:52+5:30
इच्छुकांची भाऊगर्दी : धावत्या दौऱ्यात गडकरींकडून चर्चेला फाटा

मिरजेला हॅलो, सांगलीला टाटा
सांगली/मिरज : केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर ‘कही खुशी कही गम’चे वातावरण होते. मिरजेला पंधरा मिनिटांची धावती भेट देताना त्यांनी सांगलीला दूरूनच टाटा केला. मिरजेत येऊनही कार्यकर्त्यांशी, इच्छुकांशी त्यांचा संवाद होऊ शकला नाही, तर सांगलीत इच्छुक व पदाधिकाऱ्यांनी तयारी करूनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे इच्छुकांच्या चेहऱ्यावर अपेक्षाभंगाचे भाव स्पष्टपणे दिसत होते.
केंद्रीय परिवहन आणि रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मिरजेतील खासगी फार्महाऊसवर धावत्या भेटीत कार्यकर्त्यांची भेट घेतली. भाजपच्या उमेदवारीच्या मागणीसाठी गडकरींची भेट घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक प्रतीक्षेत होते. मात्र केवळ पृथ्वीराज देशमुख यांना तुम्ही काळजी करू नका, काम होईल, असे आश्वासन देत घाईघाईने गडकरी निघून गेले.
कवठेमहांकाळ येथील अजितराव घोरपडे आणि शिवाजी (पप्पू) डोंगरे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटोपून गडकरी व खा. संजय पाटील दुपारी मिरजेत भोजनासाठी फार्महाऊसवर आले होते. खा. राजू शेट्टी, आ. गिरीश बापट, सदाभाऊ खोत, आ. चंद्रकांत पाटील, आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, ओंकार शुक्ल यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. सांगलीचे गौतम पवार, पलूस, कडेगावचे पृथ्वीराज देशमुख, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, कोल्हापूर दक्षिणचे चंद्रकांत जाधव, कऱ्हाडचे विक्रम पावसकर आदी इच्छुक उमेदवार नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी प्रतीक्षेत होते. मात्र गडकरी यांनी पाचच मिनिटात भोजन आटोपून कोणाशीही चर्चा न करता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण केले. जाता-जाता पृथ्वीराज देशमुख यांना तुमचे काम होईल, काळजी करू नका, असे आश्वासन दिले. गडकरी यांना निवेदन देण्यासाठी ठेकेदार व व्यापारी ताटकळत होते. मात्र ते कोणासही न भेटता निघून गेले. (प्रतिनिधी)