आबांच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:46 PM2019-09-01T23:46:09+5:302019-09-01T23:46:13+5:30

तासगाव : आर. आर. आबांची उंची वामन मूर्तीची असली तरी, त्यांचे कर्तृत्व हिमालयाच्या उंचीचे होते. आबांच्या जाण्याचे दु:ख अंत:करणात ...

The height of the abbey is similar to that of the Himalayas | आबांच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी

आबांच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी

Next

तासगाव : आर. आर. आबांची उंची वामन मूर्तीची असली तरी, त्यांचे कर्तृत्व हिमालयाच्या उंचीचे होते. आबांच्या जाण्याचे दु:ख अंत:करणात कायम राहील. मात्र रोहित पाटील यांच्यारूपाने राज्याला येणाऱ्या काळात कर्तृत्ववान पिढी पाहायला मिळेल, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी केले.
तासगाव येथे बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याचे पवार यांच्याहस्ते अनावरण झाले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार अमोल कोल्हे होते.
पवार म्हणाले की, आबांच्या आदर्शाची नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम हा पुतळा करेल. आबा आणि सामान्य माणसाचे वेगळे नाते होते. त्यांनी स्वच्छ चारित्र्याचा आदर्श निर्माण करून काम केले. एका विचाराने राज्यात तरुणांना कॅबिनेट मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली होती. त्यांच्या ग्रामविकास मंत्रिपदाच्या माध्यमातून झालेल्या अनेक कामांची दखल देशपातळीवर घेतली गेली.
ते म्हणाले की, राज्यात काही जिल्हे नक्षलवादाने ग्रासलेले असताना, आबांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून घेतले. नक्षलवादी भागात मोटारसायकलवरून जाणारे आबा राज्यातील पहिले मंत्री होते. आजही आदिवासी लोक आबांचे नाव घेतात. माझ्यापेक्षा २० वर्षांनी आबा लहान होते. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांचे कर्तृत्व बहरण्याचा हा कालावधी होता. आबांच्या जाण्याचे दु:ख अं:तकरणात कायम राहील. मात्र पुढच्या पिढीत पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला त्यांचा मुलगा रोहितच्या रूपाने आबा पाहायला मिळतील. आबांच्या कुटुुंबाला इथून पुढे हेच प्रेम द्या. या प्रेमातून राज्याला कर्तृत्ववान नवी पिढी पाहायला मिळणार आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, राजकारणात कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:चा ठसा उमटविण्याचा आदर्श आबांनी निर्माण केला होता. माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात येणाऱ्यांना जो आदर्श असतो, तो म्हणजे आर. आर. पाटील. शिवस्वराज्य यात्रेला महाराष्टÑभर फिरताना एकही जिल्हा असा नव्हता, जिथे आबांचे नाव निघाले नाही.
प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले की, राष्टÑवादीत आबांचे स्थान महाराष्टÑव्यापी होते. आबांची उणीव राज्यात जाणवतेच, त्याहीपेक्षा राष्टÑवादीला जाणवते. आबा असते तर आजचे चित्र वेगळे दिसले असते. २०२४ ला या मतदारसंघात रोहित पाटीलच राष्टÑवादीचे आमदार असतील.
यावेळी रोहित पाटील, अनिता सगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. सुमनताई पाटील, आ. मोहनराव कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, उमाजीराव सनमडीकर, गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल...
आबांचे आणि माझे नाते राजकारणापेक्षा भावनिक होते. त्यांनी मोठ्या कष्टाने राजकीय जीवन उभे केले होते. या कार्यक्रमाचे व्यासपीठ एका पक्षाचे असल्यासारखे झाले आहे. मात्र कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी या कार्यक्रमाला हजर राहण्याचे मी ठरवले होते, ते याच संबंधांसाठी, असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले. एकाच जिल्ह्यातील दोन तरुणांना कॅबिनेट मंत्रीपद आणि खातेवाटप करत असताना, पवार यांना कसरत करावी लागली असेल, असा उल्लेख करत, त्यावेळी जयंत पाटील माझे मित्र नव्हते, असा टोला त्यांनी लगावला.

गोपीचंदना सोबत आवाहन
आमदार विश्वजित कदम यांचे भाषण सुरु असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांचे आगमन झाले. यावेळी आमचे मित्र गोपीचंद या व्यासपीठावर आमच्यासोबत आले आहेत. यापुढेही त्यांनी प्रत्येक ठिकाणी आमच्यासोबत रहावे, असे सूचक वक्तव्य कदम यांनी केले. पतंगराव कदम यांच्याप्रमाणेच, येणाºया काळात रोहित पाटील यांचा मोठा भाऊ म्हणून आबांच्या कुटुंबासोबत कायम राहू, अशी ग्वाही आमदार कदम यांनी दिली.

चिंचणीच्या हनुमानाचा आशीर्वाद मिळेल
रोहित पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजपर्यंत आबांना तासगावच्या गणपतीचा, सिध्देश्वराचा, आरेवाडीच्या बिरोबाचा, कवठेमहांकाळच्या महांकाली देवीचा आशीर्वाद मिळाला होता. या निवडणुकीत चिंचणीच्या हनुमानाचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अविनाशकाका पाटील (भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे चुलत बंधू) हा आशीर्वाद मिळवून देतीलच, असे रोहित पाटील यांनी म्हणताच, कार्यकर्त्यांनी जयघोष केला.

खासदार कोल्हेंच्या कवितेची साद अन् उपस्थितांची दाद
‘‘जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पवार साहेबांच्या आशीर्वादाने मोठी संधी मिळते, तेव्हा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मापदंड असणाºया आबा तुमची आठवण येते...
जेव्हा राजकीय आभाळ दाटून येतं आणि लखलखणाºया विजेची कमतरता भासते, तेव्हा विरोधातही वीज होऊन कडाडणाºया आबा तुमची आठवण येते..
जेव्हा सरकारचा नाकर्तेपणा झाकायला खोटं बोलत निलाजरी यात्रा काढावी लागते, तेव्हा सरकारच्या निष्क्रियतेवर आसूड ओढणाºया आबा तुमची आठवण येते...
जेव्हा गृहमंत्रीपद असूनही महाराष्ट्राची उपराजधानी क्राईम कॅपिटल होते, तेव्हा स्वत:हून गडचिरोलीचे पालकमंत्री पद मागणारे आबा तुमची आठवण येते...
जेव्हा महापुरात सेल्फी काढणाºया, पूरग्रस्तांना ए गप्प म्हणणाºया मंत्रीमहोदयांची किळस येते, तेव्हा महापुरात खंबीरपणे उभे ठाकणाºया आबा तुमची आठवण येते...
जेव्हा आठ दिवस जनता पुराच्या विळख्यात सापडते, तेव्हा अलमट्टीचे दरवाजे उघडा अन्यथा अलमट्टी उडवून देऊ म्हणून कडाडणाºया आबा तुमची आठवण येते...’’
अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी आर. आर. पाटील यांच्यावर ‘आबा तुमची आठवण येते’ ही उपस्थितांचे काळीज हेलावणारी स्वरचित कविता सादर केली. उपस्थितांनी या कवितेला भावनिक होत टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली.

Web Title: The height of the abbey is similar to that of the Himalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.