मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपल
By Admin | Updated: August 24, 2014 23:17 IST2014-08-24T22:49:41+5:302014-08-24T23:17:27+5:30
सांगली जलमय : पलूसला विजेचा कडकडाट, इस्लामपुरातील नाले तुंबले

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपल
सांगली : सांगली, मिरज शहरासह वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यास रविवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले. तासाभराच्या पावसाने सांगली जलमय झाली होती. शहराच्या बहुतांश चौकांमध्ये, बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत पाणी साचून राहिले होते.
सांगली, मिरज शहरात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी दुपारीही जोरदार पाऊस झाला होता. रविवारी पुन्हा दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसास सुरूवात झाली.
तासभर सुरू असलेल्या या पावसाने सांगलीला जलमय बनविले. हरभर रोड, मारुती चौक, मारुती रोड, शिवाजी मंडई परिसर, झुलेलाल चौक, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी स्टेडियम, तरुण भारत क्रीडांगण, आमराई रोड, दामाणी हायस्कूल परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते. मारुती रोडवर सध्या गणेशोत्सवामुळे विक्रेत्यांनी स्टॉल उभारले आहेत. खरेदीसाठीही गर्दी होत आहे. अशावेळी मुसळधार पावसाने विक्रेते व खरेदीदार नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत मुख्य बाजारपेठांमध्ये अर्धा फूट पाणी साचून राहिल्याने नागरिकांचे, विक्रेत्यांचे हाल झाले. पावसाळी पाणीनिचऱ्याची यंत्रणा कोलमडल्याचे दिसून येत होते. महापालिकेला रविवारी सुट्टी असल्याने पाणी निचऱ्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. सांगलीत सर्वत्र पाणी साचून राहिले होते.
सांगलीच्या शंभर फुटी, चिंतामणीनगर व अन्य गुंठेवारी भागातही या पावसामुळे दलदल निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने सांगली शहरासह जिल्ह्यात आणखी आठवडाभर अशाच स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने गुंठेवारीतील अवस्था आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पावसामुळे शहरातील तपमानातही घट झाली आहे. पावसानंतर शहरात कमाल तपमान ३०, तर किमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.
दरम्यान, शिराळा, मांगले परिसराला पावसाने झोडपून काढले. या परिसरात एक तास मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सलग दुसऱ्यादिवशीही शिराळा तालुक्यात पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावले. सायंकाळी पावसामुळे शिराळ्यातील वीज गायब झाली होती. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. (वार्ताहर)