फाेटाे : २७ अल्ताफ मुलाणी
मिरज : येथे रविवारी फुले कॉलनीत गुटख्याची वाहतूक करणारी मालवाहू रिक्षा पकडून गांधी चौक पोलिसांनी एक लाख ८० हजारांचा गुटखा साठा व टेम्पो असा तीन लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी अल्ताफ रमजान मुलाणी (वय ५३, रा. श्यामरावनगर, सांगली) यास ताब्यात घेतले.
मिरजेत कोल्हापूर रस्त्यावरून महात्मा फुले कॉलनीत रविवारी सायंकाळी ५ वाजता तीनचाकी मालवाहू रिक्षातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब निळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मालवाहू रिक्षा (क्र. एमएच १० सीक्यू १२५९) अडवून झडती घेतली असता या मागील बाजूस कुरकुरे असलेली पोती व आतील बाजूस पवन बाबू गुटखा पुड्या असलेल्या पिशव्यात गुटखा साठा मिळून आला. पोलिसांनी गुटखा व मालवाहू रिक्षा असा तीन लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त करून अल्ताफ मुलाणी याला ताब्यात घेतले. कर्नाटकांतील उगार येथून गुटखा सांगलीत नेण्यात येत असल्याची माहिती मुलाणी याने पोलिसांना दिली.