लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरी भागातील गुंठेवारी वसाहतीतील वर्ग २ चे प्लॉट वर्ग एकमध्ये समाविष्ट करण्याबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या सहीसाठी पाठवला आहे, ताे राज्यात लागू होईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
समितीचे प्रमुख चंदन चव्हाण यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने १९ मे २०२१ रोजी शहरी भागातील गुंठेवारीत राहणाऱ्या जनतेला सवलत देण्याचा अध्यादेश काढला. इनाम व वतन (महार व देवस्थान जमीन वगळून) जमिनी ज्या भोगवटादार वर्ग २ च्या आहेत त्यावरील अकृषिक बांधकामे नियमित करताना प्रचलित बाजार मूल्याच्या ७५ टक्क्यांऐवजी २५ टक्के रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा अध्यादेश लवकर पारीत करून त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास अशा गुंठेवारी भागात राहणाऱ्या जनतेला भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करून सवलतीचा लाभ घेता येईल. त्यामुळे याप्रश्नी आम्ही महसूलमंत्र्यांना निवेदन दिले.
थोरात म्हणाले की, हा अध्यादेश राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठविला असून, त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष बाबासाहेब सपकाळ, भगवानदास केंगार, अतुल हंकारे उपस्थित होते.