गुलाल : लागलेला अन् चुकलेला
By Admin | Updated: July 9, 2016 00:48 IST2016-07-08T23:43:17+5:302016-07-09T00:48:48+5:30
कारण -राजकारण

गुलाल : लागलेला अन् चुकलेला
राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून जिल्ह्यात वाढू लागलेली अस्वस्थता शुक्रवारी संपली आणि संपता-संपता वाढलीही! अखेर सदाभाऊ खोत यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली, पण शिवाजीराव नाईक यांचा पत्ता ऐनवेळी कापला गेला. देवेंद्र फडणवीस सरकारनं दोघांनाही पहिल्या दिवसापासून झुलवत ठेवलं होतं. राज्याच्या स्थापनेपासून सतत मंत्रिमंडळात दिसणाऱ्या सांगलीची उपेक्षा सुरू होती. आता एकदम दोन मंत्रिपदांचं ‘बंपर प्राईज’ मिळणार, अशी चर्चा गुरुवारी दुपारपर्यंत असताना सायंकाळी नाईकांचं नाव मागं पडलं. सदाभाऊंना ‘लाल दिवा’ मिळाल्यानं वाळव्यात गुलालाची पोती रिकामी झाली अन् फटाक्यांच्या माळा फुटू लागल्या. (इस्लामपुरात ‘स्वाभिमानी’चे औट उडाल्यानं ‘घड्याळा’च्या काचा तडकल्या म्हणे!) पण शिराळ्यातलं नाईकांचं कार्यालय सुनं-सुनं झालं, त्यामुळं इस्लामपुरात ‘घड्याळ’वाल्यांनीही फटाके उडवले म्हणे! त्याचा आवाज ऐकून दोघा भाऊंना (मानसिंगराव आणि सत्यजित हो...) गुदगुल्या झाल्या.
शिवाजीराव नाईक यांना अवघा जिल्हा ‘साहेब’ नावानंच ओळखतो. पंधरा वर्षं जिल्हा परिषदेचे सदस्य, त्यात सलग दहा वर्षं अध्यक्ष! संयमी आणि अभ्यासू आमदार अशी त्यांची ओळख. शिराळ्यातल्या सळसळत्या नागासारखी आक्रमकता त्यांच्यात कमी, पण शेजारच्या वाळवा तालुक्यातल्या सदाभाऊंमध्ये ती ओतप्रोत भरलेली. सदाभाऊ म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रांगडा चेहरा. गेल्या सहा-सात वर्षांत खासदार राजू शेट्टींसोबत अधिक चर्चेत आलेला.
भाजप सरकारच्या विस्तारामध्ये दोघांनाही मंत्रिपद मिळणार असल्याचं ठामपणे सांगितलं जात होतं, पण दोन-तीनदा विस्तारच लांबला. हिरमोड झाला. कार्यकर्ते हिरमुसले. तमाम विरोधकांनी खिल्ली उडवली. सोशल मीडियावर विनोदांना ऊत आला... मधल्या काळात मिरजेच्या खाडेंचंही नाव काहींनी पुढं केलं, पण नाईक साहेबांचं नाव पहिल्या नंबरवर होतं. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभेच्या प्रचारावेळी कामेरीतल्या सभेत जाहीरपणानं सांगितलं होतं की, ‘शिवाजीराव नाईकांना निवडून द्या, कॅबिनेट मंत्री करतो.’ सदाभाऊंनाही मंत्री करणार असल्याचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याचं कानावर आलं होतं. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीला मंत्रिपद मिळणार असल्याचं चार-चारदा छातीठोकपणे जाहीर केलं होतं. पण मंत्रिपदानं वाकुल्याच दाखवल्या. आघाडी सरकारमध्ये जिल्ह्याचे तीन-तीन ‘हेवीवेट’ मंत्री होते, पण भाजप सरकारनं तोंडाला पानं पुसल्याचं बोललं जाऊ लागलं. दोन महिन्यांपूर्वी सदाभाऊ भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार झाले. तेव्हा तर, ‘आता मंत्रीपद कुठलं!’ अशी कुजबूज सुरू झाली होती.
फडणविसांनी मंत्रीपदाच्या झुल्यावर झुलवत ठेवलेल्या नाईकसाहेबांना आणि सदाभाऊंना जाम ‘टेन्शन’ आलं होतं. श्रावण अजून लांब असला तरी शिराळ्यात आषाढातच नागपंचमीची गाणी सुरू झाली होती. तिथं श्रावणाच्या आधीच मंत्रिपदाचे झोपाळे झुलायला लागले होते. (चल गं सखे वारूळाला, वारूळाला... राजपद मागू त्याला, मागू त्याला’, अशी गाणीही ऐकू येत होती म्हणे!) त्यातच गुरुवारी निरोप आला आणि सदाभाऊंच्या लोकांचे चेहरे फुलले. गाड्या भरून तयारच होत्या. (पण आताचा निरोप तर खरा का, असं जीपमध्ये बसलेल्या काहींनी विचारलंच!) गुलालाची पोती अन् फटाक्यांच्या पेट्यांची थप्पी लागली होती. संध्याकाळी निरोप आला अन् त्या गाड्या सुसाट मुंबईकडं सुटल्या. मुंबईच्या वाऱ्या करून दमलेली ही माणसं येत्या १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सदाभाऊंना बघण्यासाठी आता टेचात जातील...
जाता-जाता : जिल्ह्यात भाजपचे चार-चार आमदार असताना त्यांना डावलून ‘स्वाभिमानी’च्या सदाभाऊंना मंत्रिपद दिल्याचं तमाम भाजपेयींना जिव्हारी लागलंय. नाईकसाहेबांच्या गटाचा पुन्हा हिरमोड झाला. कुणी म्हणतं, त्यांनी राज्यमंत्रिपद नाकारलं (कॅबिनेट हवं होतं ना!), तर कुणी म्हणतं, चार वाजेपर्यंत चर्चेत असणारं नाव एका फोनमुळं मागं पडलं... (कुणाचा असावा बरं तो फोन?)
ताजा कलम : इस्लामपूरचे साहेब गुरुवारी मुंबईत होते. दिवसभर व्यस्त होते. पहाटे-पहाटे ते इकडं आले. येताना पेठनाक्यावर फटाके वाजले म्हणे. ते दचकून जागे झाले. डोळा लागला होता... पेठनाक्यावर फटाके वाजल्याचे दिसताच त्यांनी शिराळ्याकडे बघत गाडीत असलेल्या तात्यांना टाळी दिली...
(या घटनेचा वरील मजकुराशी काहीही संबंध नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या माहितीस्तव. मंत्रिपद असं कापलं जात नसतं. वजनदार खात्यांनंतर किरकोळ वनखातं मिळालेल्या सोनसळकर साहेबांना विचारा!)
छत्तीसचा आकडा
इस्लामपूरच्या साहेबांशी नाईकसाहेब अन् सदाभाऊंचा छत्तीसचा आकडा. इस्लामपूरकरांशी जमत नसल्यानंच नाईकसाहेबांनी घड्याळाची संगत सोडून पुन्हा हात हातात घेतला होता. पण तिथं इस्लामपूरकरांचे साडूच दावेदार असल्यानं निराशाच पदरी पडली. अखेर त्यांनी राजू शेट्टींशी हातमिळवणी केली. शेट्टींच्या सल्ल्यानं भाजपचं तिकीट मिळवलं आणि जागा जिंकली. पण पुढं इस्लामपूरकर पुन्हा आडवे आले. इस्लामपूरकर साहेबांचा कमळाबाईशी छुपा दोस्ताना असल्यानं त्यांनी नाईकसाहेब अन् सदाभाऊंच्या मंत्रिपदाच्या वाटेत काटे पसरल्याची कुजबूज वाढली. त्यात नाईकसाहेबांची मिरजेच्या खाडेंशी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र तयार केलं गेलं. अखेर नाईकसाहेबांनी नाही, पण सदाभाऊंनी बाजी मारलीच. (सदाभाऊ आमदार झाल्यावर दिवंगत राजारामबापूंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अन् दिलीपतात्यांना भेटण्यासाठी का गेले होते, याचं कोडं आता उलगडलं..!)
चळवळीचं काय होणार?
सदाभाऊंमुळं जिल्ह्याचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपला, पण खुद्द सेनापतीच सत्तेत गेल्यावर शेतकऱ्यांच्या चळवळीचं काय होणार, असा सवाल काही नतद्रष्ट करू लागले आहेत. खरं तर ‘स्वाभिमानी’नं (‘स्वाभिमान गहाण टाकून’ : असं घड्याळवाले म्हणतात...) शेतकऱ्यांची व्होट बँक तयार करण्यासाठी, आमदार वाढवण्यासाठी महायुतीत जायचा (कुणी म्हणतं, महायुतीच्या वळचणीला जायचा) निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्या आंदोलनाची धग संपल्याचं बोललं जात होतं. सत्तेच्या उबीनं गेल्यावर्षी सदाभाऊ रस्त्यावर उतरलेच नाहीत. सरकारला नुसत्याच ढुसण्या दिल्या. त्यामुळं उसाची एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचं काय झालं, याचं उत्तर ना त्यांच्याकडे आहे, ना चळवळीकडे!
श्रीनिवास नागे