‘यशवंत’च्या कर्जाला संचालकांची हमी
By Admin | Updated: August 31, 2015 21:47 IST2015-08-31T21:47:35+5:302015-08-31T21:47:35+5:30
जिल्हा बँक : ३५ कोटींच्या नुकसानीचा संचालकांवर ठपका--जिल्हा बँक गैरव्यवहार-२

‘यशवंत’च्या कर्जाला संचालकांची हमी
सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याला प्रशासकीय मान्यता न घेताच कर्जवाटप केल्याची बाब आरोपपत्रात आली आहे. यातील एका कर्ज प्रकरणासाठी बँकेच्या तत्कालीन संचालकांनी वैयक्तिक व सामुदायिक हमी दिली असल्याने हे कर्ज प्रकरण संचालकांच्यादृष्टीने अधिक अडचणीचे ठरणार आहे. कारखान्याच्या कर्ज वाटपात बँकेला एकूण ३५ कोटी ६ लाख ६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्यास ३१ डिसेंबर २00५ रोजी संचालक मंडळाच्या सभेत मालताबेगहाण म्हणून १५ कोटी रुपये व १ कोटी नजरगहाण कर्ज मंजूर करण्यात आले. त्यासाठी कारखान्याची जमीन, कारखाना इमारत, प्रशासकीय इमारत, साखर गोदाम, कर्मचारी वसाहत, विश्रामगृह, कामगार भवन, मोलॅसिस टँक, शुगर हाऊस, पंप हाऊस, बॉयलर हाऊस आदी स्थावर व यंत्रसामग्री तारण घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे कारखान्याच्या सर्व संचालकांनी या कर्जासाठी वैयक्तिक व सामुदायिक हमी घेतलेली आहे. हे कर्ज देताना मंजुरी पत्रातील कोणत्याही अटींची पूर्तता केली नाही. या कर्जास साखर आयुक्तांच्या मान्यतेची गरज असताना, त्यांच्या मान्यतेचा विचार केला गेला नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जादा रकमेची कर्जे कारखान्याला उभारता येत नाहीत. असे असताना जादाचा कर्ज पुरवठा करण्यात आला. तसेच कारखान्याचे नेटवर्थ व एन.डी.आर. उणे होती. कर्जमर्यादाही संपण्याबरोबरचअपुरा दुरावाही निर्माण झाला होता. बँकेच्या कार्यकारी समितीनेही १७ फेब्रुवारी २00४ रोजी २८ कोटी ३ लाख २९ हजार रुपयांचे खेळते भांडवली मध्यम मुदत रुपांतर कर्ज मंजूर केले. या कर्जास शासनाने ४१ कोटी ६ लाख ८२ हजार रुपयांची विनाअट थकहमी दिली आहे. या कर्ज मंजुरीलाही साखर आयुक्तांची परवानगी नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कारखान्याला कर्ज उभारता येत नसताना, या कर्जाचा पुरवठा झाला. त्यापूर्वी २५ आॅगस्ट १९९९ रोजी कार्यकारी समितीनेच ९७ लाख ७४ हजार रुपयांचे मध्यम मुदत (यंत्रसामग्री) कर्ज मंजूर केले होते. या तिन्ही कर्जांबाबत वसुलीसाठी बँकेने मालमत्ता ताब्यात घेतली होती. मात्र कारखान्याच्या विक्रीचा निर्णय प्रशासकांच्या कालावधित झाला. कारखान्याची ५६ कोटी ५१ लाख रुपयांना विक्री करण्यात आली. सध्या कारखान्याकडून तिन्ही कर्जापोटी ३५ कोटी ६ लाख ६ हजार रुपये येणे आहेत. या नुकसानीला व त्यावरील व्याजाला तत्कालीन संचालक, यांना जबाबदार धरले आहे. (प्रतिनिधी)
हे दिग्गज अडचणीत
आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, माजी मंत्री मदन पाटील, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, विजयकुमार सगरे, लालासाहेब यादव, डी. के. पाटील, अमरसिंह नाईक, विद्यमान संचालक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, प्रा. सिकंदर जमादार यांचा याप्रकरणी समावेश आहे.