सांगलीतील भाजपमध्ये गटबाजी पुन्हा उफाळली
By Admin | Updated: September 23, 2014 23:57 IST2014-09-23T23:30:28+5:302014-09-23T23:57:14+5:30
विधानसभा निवडणूक : पदाधिकाऱ्यांच्या कुरघोड्या सुरू

सांगलीतील भाजपमध्ये गटबाजी पुन्हा उफाळली
सांगली : विधानसभेच्या सांगलीतील उमेदवारीवरून भाजपअंतर्गत गटबाजी उफाळली आहे. आ. संभाजी पवार विरुद्ध इच्छुक व पदाधिकाऱ्यांचा गट आमने-सामने आले आहेत. मुंबईत प्रदेशच्या नेत्यांना भेटून पदाधिकाऱ्यांच्या गटाने पवारांच्या उमेदवारीस विरोध दर्शविला, तर पवार गटाने मंगळवारी आपली भूमिका मांडून, उमेदवारीत बदल न करण्याची मागणी केली.
आ. संभाजी पवारांचे समर्थक एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला इच्छुक व पदाधिकाऱ्यांचा गट आक्रमक झाला आहे. खासदार संजय पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, इच्छुक उमेदवार सुधीर गाडगीळ, धनपाल खोत यांनी संभाजी पवारांना उमेदवारी दिली तर बंड पुकारू, असा इशारा सोमवारी मुंबईत झालेल्या भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिला. पवारविरोधी गटातील कोणालाही उमेदवारी दिली, तर सर्व एकसंधपणे काम करतील, अन्यथा भाजपचे कार्यकर्ते पवारांचे काम करणार नाहीत, असा स्पष्ट इशाराच या पदाधिकाऱ्यांनी दिला.
तीन महिन्यांपूर्वी दोन्ही गटाकडून अशाच कुरघोड्या झाल्या होत्या. दोन्ही गटातील नेते एकमेकाविरोधात मुंबईतील नेत्यांसमोर तक्रार करीत होते. लोकसभा निवडणुकीत संभाजी पवारांनी संजय पाटील यांचा प्रचार केला नव्हता. पक्षाचे अनेक नेते याठिकाणी आल्यानंतरही त्यांनी बंडाची भूमिका सोडली नाही.
सांगली लोकसभा मतदारसंघात त्यांनी तटस्थ राहणे पसंत केले होते. त्यानंतरही संजय पाटील निवडून आले. विधानसभेसाठी विद्यमान आमदार म्हणून त्यांनाच संधी देण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरू असल्याची कुणकुण त्यांच्याविरोधी गटाला लागली. उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच त्यांनी पवारांच्या लोकसभेतील कारनाम्यांची माहिती दिली.
पक्षाने विद्यमान आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांची उमेदवारी नाकारावी, अशी मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्याकडे केली. निवडणुकीला तीन आठवड्यांचाच कालावधी उरल्याने भाजपअंतर्गत हा संघर्ष सहजासहजी शांत होईल, याची शक्यता कमी आहे. (प्रतिनिधी)
टीका करणार नाही!
एकीकडे मुंबईत पवार गटाने नेत्यांची भेट घेतली, तर दुसरीकडे संभाजी पवारांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांनी समर्थकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांविरोधात टीका करणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. पदाधिकारी व अन्य इच्छुकांनी अशी मागणी करणे चुकीचे नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वजण एकत्र येतील. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याशी असलेला आमचा विरोध जनतेच्या प्रश्नावरचा आहे. आम्ही तो तडीस नेणार. राजकारणात कोणाशी तडजोड करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संभाजी पवार गटाने घेतली भेट
सोमवारी पवारविरोधी गटाने संताप व्यक्त केल्यानंतर लगेचच आज दुसऱ्यादिवशी पृथ्वीराज पवार, गौतम पवार व अन्य कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस, तावडे यांची भेट घेतली. लोकसभेच्या भूमिकेमागचे कारण स्पष्ट करून त्यांनी यापूर्वीच्या कामाची दखल पक्षाने घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली. पवारविरोधी गटाला बाहेरील नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याची तक्रारही त्यांनी केल्याचे समजते.
...तर वेगळी भूमिका
संभाजी पवारांनाच उमेदवारी दिली तर सर्व पदाधिकारी, इच्छुक व कार्यकर्ते एकत्रित बसून भूमिका ठरवतील, अशी माहिती नीता केळकर यांनी दिली. दुसरीकडे धनपाल खोत यांनी, पवारांनाच उमेदवारी मिळाली तर आम्ही सर्वजण त्यांचे काम करणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे नेतेमंडळीही संभ्रमात आहेत.