सांगली, मिरजेत सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST2021-01-04T04:23:02+5:302021-01-04T04:23:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विविध सामाजिक संघटनांसह पक्ष, शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्यावतीने रविवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी ...

सांगली, मिरजेत सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विविध सामाजिक संघटनांसह पक्ष, शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्यावतीने रविवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबवून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
सांगलीतील गणेश मार्केटजवळील शिवसेना कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख मानसी शहा व प्रियंका साळी यांनीही प्रतिमापूजन करून अभिवादन केले. साखळकर यांचा कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षणाच्या बाबतीत सांगली-मिरज शहर खूप महत्त्वाचे असताना, अशा मोठ्या शहरांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र असणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक मंत्र्यांनी लक्ष घालून येथे विद्यापीठ उपकेंद्र उभे करावे, अशी मागणी यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी रावसाहेब घेवारे, जितेंद्र शहा, प्रियंका साळी, जयश्री कोळी, महेश पाटील, प्रशांत भोसले उपस्थित होते.
भाजपा ओबीसी सेलतर्फे जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. आ. सुधीर गाडगीळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गाडगीळ म्हणाले, सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे, तर त्या एक उत्तम कवयित्री, अध्यापिका, थोर समाजसेविका आणि पहिल्या विद्याग्रहण करणाऱ्या महिला देखील होत्या. महिलांच्या मुक्तिदात्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षित करण्याकरिता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरिता खर्ची घातले.
यावेळी नसीमा काझी, ॲड. शैलजा पंडित, डॉ. वैदेही लोमटे, सभापती लक्ष्मीताई सरगर, स्नेहल कुंभार (शिक्षिका) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेखर इनामदार, स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे-पाटील, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, सोनाली सागरे, ज्योती कांबळे, अमर पडळकर आदी उपस्थित होते.